सांगोला : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारकरी सांप्रदायने आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी २ जूनला शासनाला निवेदन सादर करावे. यामुळे पालखी सोहळ्याच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही, या दृष्टीने अधिवेशनानंतर बैठकीच्या माध्यमातून सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन शरद पवार यांनी वारकरी सांप्रदायच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी सांगोल्यात दिले. या बैठकीत बोलताना विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्यपूजेसाठी स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असा आग्रह आ.भारत भालके यांनी केला. ज्या ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असे राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी सांगितले़ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी वारकरी सांप्रदायचे चार प्रतिनिधी घेऊन दर तीन महिन्यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन चर्चा झाली पाहिजे, असे आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी मत मांडले. नरहरी महाराज चौधरी म्हणाले, शासनाकडे सतत संपर्क साधूनही आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, म्हणून शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले़ वारकरी सांप्रदायचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल पाटील यांचे नाव सर्वानुमते निश्चित केले आहे.
-----------------------------
वारकर्यांच्या प्रमुख मागण्या
प्रत्येक मुक्कामी ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था व पाणी, वीज, शौचालयाची सोय करणे़ देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे चौपदरीकरण करणे १० वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची रखडलेली कामे पूर्ण व्हावीत़ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती गठित करताना वारकरी प्रतिनिधीला नेमावे़ तसेच पुण्यामध्ये वारकरी भवन असावे. विठ्ठल-रुक्मिणीच्या पुजार्यासंदर्भात समितीने आततायीने निर्णय घेऊ नये़ शासनाचे धोरण उदासीन शासनाचे पालखी सोहळ्याबाबत धोरण उदासीन असून, निधीची पूर्तता केली जाते. मात्र प्रत्यक्षात कामावर निधीच खर्च केला जात नाही, असा तक्रारींचा पाढा वारकरी प्रतिनिधींनी वाचला.
---------------------------------
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन अधांतरीच !
माळशिरस, नातेपुते, सदाशिवनगर या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो. या ठिकाणी मात्र पालखी तळासाठी जागा पूर्तता केली आहे. मात्र इतर ठिकाणी पालखीच्या मुक्कामाबाबत जागांची निश्चिती केली नसल्यामुळे वारकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारकरी सांप्रदायने शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या अडीच वर्षांत काहीच केले नाही, उलट मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
------------------------------
ज्याठिकाणी पालखीचा मुक्काम केला जातो तेथील परिसरात ५० ते ५५ एकराचे क्षेत्र आरक्षित केले पाहिजे. त्या क्षेत्राला वॉलकंपाउंड करुन पालखीच्या एक दिवसाच्या मुक्कामानंतर या जागा एखाद्या शाळेच्या क्रीडांगणासाठी वापरास देऊन नियोजन केले पाहिजे. -अण्णासाहेब डांगे, अध्यक्ष, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
----------------------------
मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व पालकमंत्री अशा तीन वेगवेगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्याच्या अडचणी, समस्यांबाबत बैठका घेण्याऐवजी एकाच अधिकार्याला नियुक्त करुन समस्या सोडवल्या पाहिजेत. -विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार
---------------------------
शिष्टमंडळातील मान्यवर वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, भाऊसाो महाराज पाटील, विठ्ठल महाराज देहूकर, राजेंद्र महाराज मोरे़