पिराचीकुरोली (जि. सोलापूर) : विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भेटीसाठी वाटचाल करीत असलेल्या जगद्गुुरू संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील वारक-यांनी शुक्रवारी तोंडले-बोंडलेच्या उतारावर ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात धावा करून वारीतील चालण्याचा शिणवटा घालवला. वाटेत सोपानकाकांच्या पालखीचे व माऊलींच्या रथाचे दर्शन घेऊन भक्तिरसात न्हाऊन निघालेला हा सोहळा पंढरपूर तालुक्यात पिराचीकुरोली येथे विसावला.बोरगाव येथील मुक्काम आटोपून सोहळा सकाळी ७ वाजता तोंडले-बोंडलेकडे मार्गस्थ झाला. माळखांबीमार्गे जाताना बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराजांना विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे प्रत्येक दिंडीतील वारकºयांनी तसेच सोहळा प्रमुख, संस्थानच्या पदाधिकाºयांनीही धावा केला. काकासाहेब चोपदार हे प्रत्येक दिंडीतील वारकºयांना धाव्यासाठी सोडत होते. आज रथही जोरात धावला.सोहळा तोंडले-बोंडले येथे दाखल झाला त्यावेळी माऊलींची पालखीदेखील दुपारच्या विश्रांतीसाठी दाखल झाली होती तर माऊलींचा रथ बाहेर रोडवर उभा होता. तुकारामांच्या पालखी सोहळ्यातील वारकºयांनी माऊलींच्या रथाचे तर काही जणांनी गावात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले. याच दरम्यान संत सोपानकाकांची पालखी ही माऊली व तुकोबांची वाट पाहत थांबली होती. तुकारामांचा सोहळा बोंडले येथे येताच संत सोपानकाका आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रथ एकमेकांजवळ आणण्यात आले. दोघा संतांची भेट झाल्यानंतर सोहळा प्रमुख अभिजित मोरे महाराज व नारायण गोसावी यांनी एकमेकांना मानाचे नारळ दिले. याबरोबरच संताजी महाराज जगनाडे यांनीही तुकोबांची भेट घेतली.>भक्तांचा महापूर : यंदा दोन्ही पालखी सोहळ्यात दरवर्षीच्या दीडपट गर्दी आहे. त्यामुळे या तीन प्रमुख पालख्यांबरोबरच बोंडले ते पिराची कुरोली फाटा यादरम्यान अनेक छोटे-मोठे सोहळे व दिंड्या एकाच मार्गावरून चालत असल्याने सुमारे पाच ते सहा लाख वारकरी या मार्गावर विठुनामाचा गजर करीत होते. त्यामुळे हा टप्पा म्हणजे खºया अर्थाने भक्तीचा महापूर आल्यासारखा दिसत होता.>ठाकूरबुवांच्या समाधीपुढे माऊलींचे रिंगणपंढरपूर (जि. सोलापूर) : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण शुक्रवारी सकाळी ठाकूरबुवांच्या समाधीसमोर पार पडले. सकाळचा उल्हास, वातावरणातील प्रसन्नता आणि माऊलींचे चौखुर उधळलेले अश्व अशा भावगर्भी वातावरणात ठाकूरबुवांची समाधी तेजाळली. वेळापुरातील पालखी तळावरून सकाळी साडेसहा वाजता माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. हरिनामाच्या गजरात हा सोहळा ठाकूरबुवांच्या समाधीजवळ आला. रांगोळ्यांनी सजलेल्या मार्गावरून पुढे सरकत परंपरेनुसार माऊली ओट्यावर विराजमान झाल्यावर अश्वांनी रिंगण घातले. दोन रिंगण पूर्ण झाल्यानंतर लक्षावधी जनसमुदायाने माऊलींचा गजर केला.उडीचा चित्ताकर्षक खेळगोल रिंगण झाल्यानंतर दिंडीकºयांचा उडीचा खेळ रंगला. टाळकरी, मृदंगवादक, वीणेकरी आणि वृंदावनधारी महिलांचा उडीचा खेळ रंगला. टाळ-मृदंगाचा ध्वनी आणि ज्ञानोबा माऊलींचा जयघोष अशी अनुभूती घेताना थेट ब्रह्यांड निनादत असल्याचा अनुभव येत होता. एकाच वेळी लयबद्धपणे वाजणारा मृदंगांचा ठेका देहभान हरविणारा होता.सर्व पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखलसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सर्वप्रथम दुपारी साडेतीनच्या दरम्यान टप्पा येथे पंढरपूर तालुक्यात आगमन झाले. त्यानंतर माऊली टप्पा येथे पोहोचली. त्यानंतर १० मिनिटांनी सोपानकाकांचे आगमन झाले. दोन्ही संस्थानच्या वतीने एकमेकांना मानाचे नारळ देऊन सत्कार केले. सोपानकाकांची पालखी पुढे गेली आणि पुन्हा माऊली मार्गस्थ झाले. टप्पा येथे माऊलींच्या भजनाने व टाळ-मृदंगाच्या निनादाने वातावरण भक्ती व आनंदमय झाले होते. माऊलींची पालखी भंडीशेगावमध्ये तर तुकाराम महाराज यांची पालखी पिराचीकुरोली येथे मुक्कामासाठी विसावली.
पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकऱ्यांचा धावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 5:25 AM