सोलापूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खिशाला शुक्रवारपासून वॉर्न कॅमेरा लावण्यात येणार आहे. कारवाई दरम्यानच्या प्रत्येक हलचालीचे रेकॉर्डिंग होणार आहे.
पोलीस आयुक्तालयातील सभागृहात वाहतूक शाखेच्या ५० कर्मचाऱ्यांना कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस आयक्त हरिश बैजल, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे उपस्थित होते. शहरातील वाहतूक शाखेला शिस्त आणत असताना अनेक वेळा वाहन चालकासमवेत वादविवाद होत होते. त्यानंतर एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत होते. याला आळा बसण्यासाठी वॉर्न कॅमेऱ्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पाठवण्यात आला होता. पाच कॅमेरे प्राप्त झाले असून त्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त हरिश बैजल म्हणाले की, कॅमेऱ्यामुळे चूक कोणाची आहे हे तत्काळ समजणार आहे. पोलीस कर्मचारी जर उद्धट वर्तन करत असेल तर त्याचेही रेकॉर्डिंग होणार किंवा वाहनचालक चुकीचा वागत असेल तर तेही कॅमेऱ्यामध्ये येणार आहे. या प्रकारामुळे वाहतुकीला शिस्त लागणार आहे. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, पोलीस निरीक्षक राजन माने, पोलीस उपनिरीक्षक होटकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शून्य पावती दिवस साजरा करू
० शहरात सर्व वाहतूक व्यवसस्था सुरळीत पार पडण्यासाठी चालकांमध्ये शिस्त आली पाहिजे. चालकांनी स्वयंशिस्तीने नियमाचे पालन करावे, नवीन वर्षात एक दिवस पूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत चालली पाहिजे. एकही पावती त्या दिवशी शहरात झाली नाही पाहिजे, असा प्रयत्न केला जाईल. यासाठी वाहनचालकांनी सहकार्य केल्यास ते शक्य होईल अन् वाहतुकीमध्ये शिस्त येण्यास मदत होईल, असे मत यावेळी पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी व्यक्त केले.