सोलापूर : लॉकडाऊनमध्ये सर्वच घटकांना घरी बंदिस्त व्हावे लागले. रोजगार बुडाला, नोकऱ्या गेल्या अन् डोळ्यासमोर आलेली अंधारी घालवून ‘प्रकाश’ देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी महावितरण सक्तीने बिल वसूल करीत आहे. लॉकडाऊनमधील वीज बिले घेऊ नका, अन्यथा येत्या ८ दिवसामध्ये लाखाचा एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
लॉकडाऊनमधील वीज बिले भरु नका, असे आवाहन करुन चंदनशिवे म्हणाले, लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले होते. त्यामुळे वीज कनेक्शन कट केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. आजही अनेकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन काळातील वीज बिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत व थकीत वीज बिलासंदर्भात कारवाईचा आदेश रद्द करण्यात यावा. गोरगरीब जनता आणि मध्यमवर्गीयाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणीही चंदनशिवे यांनी केली आहे. लॉकडाऊनमध्ये वंचित घटकांना अनेक त्रास सहन करावा लागला. आजही हे घटक रोजगारासाठी धडपडत आहेत. याचा विचार राज्य शासनाने जेणेकरुन वीज मंत्रालयाने करावा, असेही त्यांनी सुचवले आहे. वीज बिले भरु नका, याबाबत आघाडीच्या वतीने जनजागरण करण्यात येत असून, त्याबाबत शहरातील हजार रिक्षांवर पत्रके चिटकवण्यात आली आहेत.
पत्रकार परिषदेस नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगुंडे, कोषाध्यक्ष बबन शिंदे, अंजना गायकवाड, जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला, गौतम चंदनशिवे, अनिरुद्ध वाघमारे, विनोद इंगळे, विठ्ठल पाथरूड, विजयनंद उघडे उपस्थित होते.
गोरगरिबांचे शासन असेल तर त्यांनी गोरगरीब जनता आणि मध्यमवर्गीय (नोकरदार) मंडळींचा विचार करावा. लॉकडाऊनमधील वीज बिल माफ झाले तर ही जनता तग धरणार आहे.
-आनंद चंदनशिवे, नगरसेवक.