सध्या या ठिकाणाहून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांना अपघातालाही सामोरे जावे लागते. ऊस वाहतूक, मालवाहतूक प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही. या प्रश्नाबाबत नुकतेच आमदार राम सातपुते यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने कामे पूर्ण करा अन्यथा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नुकताच दिला आहे.
या महामार्गाचे काम सुरू होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते सुस्थितीत तयार झाले आहेत.
पाटील वस्ती (अकलूज) येथील रस्ता मात्र उखडलेल्या स्थितीत असून, तीव्र उतार असल्यामुळे एकेरी वाहतूक करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. उन्हाळ्यात धुळीचे, तर पावसाळ्यात निसरड्या रस्त्याचा सामना ही बाब नित्याची झाली आहे. सध्या उसाची वाहतूक या रस्त्याने सुरू असल्यामुळे आणखीन धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यासाठी आणखी किती दिवस प्रवाशांचा जीव टांगणीला लावला जाणार असल्याचा संतप्त सवाल प्रवाशांमधून येत आहे.
---
रस्त्यावर विजेचे खांब जैसे थे!
रस्त्यावर अनेक ठिकाणी विजेचे धोकादायक खांब जैसे येथे आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाला काम करून घेण्यासाठी वारंवार विनंती करूनही रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष करत आहे. यामुळे आमदार सातपुते यांनी याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे.