मोहोळ/सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गुरुवारी मतदानाच्या दिवशी खंडोबाचीवाडी येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्राबाहेर जमावबंदीचा आदेश असताना एकत्रितरित्या थांबून असभ्य वर्तन केले म्हणून झेडपी सदस्य बाळराजे पाटील यांच्यासह ८ जणांवर आचारसंहितेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय अन्य दोन प्रकरणातही कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात यांनी कपबशीचे बटण दाबल्यानंतर कमळाला मत जात असल्याची तक्रार दिली. जिल्हाधिकाºयांनी ही तक्रार फेटाळून लावली.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी बारा वाजता जमावबंदीचा आदेश असताना झेडपी शाळा येथील बुथ क्रमांक सहा या मतदान केंद्राबाहेर झेडपी सदस्य बाळराजे पाटील, स्वप्नील बाळासाहेब साळुंखे, मेहबूब बागवान, सोमनाथ संदीप गुंड, विजय गजानन साळुंखे व म्हेत्रे या आठ जणांसह ३० ते ४० अज्ञात इसमांनी जमावबंदीचा आदेश असताना केंद्राबाहेर थांबून बेशिस्त वर्तन केल्याबद्दल भादंवि १४३, १८८, १३५, लोकप्रतिनिधी कायदा कलम १३०, १३१, १३२ चा भंग केला म्हणून वरील आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही कार्यकर्ते आहोत, तुम्हाला नोकरी करावयाची नाही का?, तुम्ही आम्हास व इतर साथीदारांना का हाकलून दिले असे म्हणून शिवीगाळ करून अंगावर धावून येत तुम्ही नोकरी कशी करता अशी भाषा वापरून पोलिसांशी झटापट करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एकच्या सुमारास खंडोबाचीवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बुथ क्रमांक ४२ व ४३ येथील राजेंद्र दगडू नरके (वय ४५, रा.खंडोबाची वाडी), किरण अंकुश उमदे (वय २१, रा. खंडोबाची वाडी, ता.मोहोळ) यांनी पोलिसांना शिवीगाळ करून अंगावर धावून येत नोकरी कशी करता अशी भाषा वापरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध ३५३,३२३,१८८,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
आणखी एका फिर्यादीनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंडोबाची वाडी येथे झेडपी प्राथमिक शाळा येथे बुथ क्रमांक ४२ व ४३ परिसरात जमावबंदी आदेशाप्रमाणे पाच किंवा पाच पेक्षा जास्त इसम एकत्र न जमण्याबाबत निर्देश असताना मतदान केंद्राजवळ मतदारांना अडथळा होईल असे वर्तन करताना आढळले. त्यांनी आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन केले म्हणून, खंडोबाचीवाडी येथील ११ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दुपारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी सुमारास काही लोक विनाकारण रेषेजवळ जमा झालेले दिसले. त्यावेळी त्यांना येथे न थांबण्याबाबत सांगितले असता ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यामुळे राजेंद्र दगडू नरके (वय ४५, रा.खंडोबाची वाडी), तानाजी रामचंद्र नरके (वय २९, रा.खंडोबाची वाडी), किरण अंकुश उमदे (वय २१ रा.खंडोबाची वाडी), विनायक मनोहर मुसळे (वय ३५, रा.खंडोबाची वाडी), रकमाजी शामराव शिंदे (वय ६०, रा.खंडोबाची वाडी), संतोष रकमाजी शिंदे (वय २७, रा.खंडोबाची वाडी, ता.मोहोळ), महेश सिद्धेश्वर म्हमाणे (वय २८, रा.अनगर), हाजू बाबासाहेब बागवान (वय ३६ रा.अनगर), संदेश राजेंद्र नरके (वय १४, रा.खंडोबाची वाडी), फैयाज रबीसलाम शेख (वय २४, रा.अनगर), राजू बाबासाहेब बागवान (वय ४०, रा.अनगर, ता.मोहोळ), यांच्याविरुद्ध भादंवि १४३, १८८ मुपोका १३५ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १३१, १३२ प्रमाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक यांनी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी बळाचा वापर करीत असताना पळून जात असताना पडल्याने व मार लागल्याने महेश सिद्धेश्वर म्हमाणे (वय २८, रा.अनगर), हाजू बाबासाहेब बागवान (वय ३६ रा.अनगर), संदेश राजेंद्र नरके (वय १४, रा.खंडोबाची वाडी), फैयाज रबीसलाम शेख (वय २४, रा.अनगर, ता.मोहोळ), राजू बाबासाहेब बागवान (वय ४०, रा. अनगर, ता.मोहोळ) असे लोक जखमी झाले आहेत.