वडाळा : आम्ही पण माणसंच आहोत. पण तशी वागणूक मिळतेय कुठं? वडाळा गावात आम्हाला पाणी फाउंडेशनच्या कामात सहभागी करुन घेतले. समाधान वाटतंय. आम्हाला माणूस म्हणून किंमत द्या, सामाजिक कार्यक्रमांत सहभागी करुन घ्या, असे भावनिक आवाहन तृतीयपंथीयांनी केले.
सलग दुसºया वर्षी वडाळा गावाने सिनेअभिनेते अमीर खान यांच्या सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, या उपक्रमाचा प्रारंभ सोमवारी ८ एप्रिल रोजी कीर्तनकार ह.भ.प. दिगंबर फंड महाराज, वडाळा गावच्या सरपंच छाया कोळेकर, उपसरपंच जितेंद्र साठे, प्राचार्य डॉ.जी.एन. चिट्टे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जमदाडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे, दत्तात्रय गायकवाड गुरुजी, नारायण गाडे, ज्ञानदेव साठे, लक्ष्मण कोळेकर, बापूराव साठे, मुख्याध्यापक सी.एम. साठे, संजयकुमार वाघमारे, दयानंद शिंदे, तात्या सुपाते, माजी सरपंच बाळासाहेब सुतार, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गायकवाड, मनोज साठे, संपत गाडे, मिलिंद साठे, पांडुरंग नागणे, जीवन साठे, दिनेश साठे, प्रवीण साठे, जयदीप साठे, विकास गाडे, आयुब सय्यद, नवोदित कलाकार संदेश आडगळे यावेळी उपस्थित होते.
गावकरी निघाले वाजत-गाजत- वडाळा गावातून वाजत गाजत गावकºयांचा जथ्था सोलापूर-बार्शी रस्त्यावरील लोकमंगल महाविद्यालयालगत असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामाच्या ठिकाणी पोहोचला. काका साठे स्वत: खांद्यावर टिकाव घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. गावातील महिलांच्या डोक्यावर टोपली होती. शाळकरी मुलंही मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती़ उद्घाटनापूर्वी काका साठे यांनी गावकºयांना जोशपूर्ण शब्दात मार्गदर्शन केले.