सोलापूर: पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्याचे काम नंबर-१ झाले असून वडाळा गाव राज्याच्या स्पर्धेत उतरेल इतके काम झाल्याचे सांगण्यात आले. उत्तर तालुक्यात स्पर्धेच्या कालावधीत ६४ लाख घनमीटर इतके काम झाले आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांची निवड झाली होती. उत्तर सोलापूर व सांगोला तालुक्याची सलग दुसºया वर्षी निवड केली होती. मागील वर्षी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज, भागाईवाडी, बेलाटी, पडसाळी, नान्नज या गावच्या नागरिकांनी चांगले काम केले होते.
सर्वसामान्य नागरिकांनी वॉटर कप चळवळ रुजविल्याने याही वर्षी उत्तर तालुक्याची निवड केली आहे. पाणी फाउंडेशनने केलेल्या निवडीला उत्तर तालुक्यातील नागरिकांनी तितकीच दाद दिली आहे. यामुळेच उत्तर तालुक्यात तब्बल ६४ लाख घनमीटर इतके काम झाले आहे. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने पाणी चळवळ गावोगावात पोहोचल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच कामांचे नियोजन गावकºयांनी केले होते. मागील वर्षी नवीन असल्याने गावकºयांना कामाचा अंदाज आला नव्हता. या वर्षी मात्र पाणी फाउंडेशनचे समन्वयक व गावोगावच्या प्रशिक्षण घेतलेल्यांनी गावकºयांना कामासाठी सहभागी करून घेतले.
याचाच फायदा कामाचा दर्जा व काम वाढण्यासाठी झाला. उत्तर तालुक्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, इंद्रजित पवार, सभापती संध्याराणी पवार यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन नागरिकांना प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी तर वडाळा गाव पाणीदार करण्यासाठी चंगच बांधला होता. जिल्ह्याच्या आकडेवारीवर नजर टाकली असता सोलापूर जिल्ह्यातील सहापैकी उत्तर सोलापूर तालुक्याचे चांगले काम झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. राज्यात स्पर्धेत उत्तर तालुका उतरेल, असेही सांगण्यात आले.
दृष्टीक्षेप...
- - ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान ४५ दिवसात सोलापूर जिल्ह्यात सहा तालुक्यात १८२ लाख घनमीटर काम झाले.
- - उत्तर सोलापूर तालुक्यात ६४ तर सांगोला तालुक्यात ४० घनमीटर काम झाले.
- - माढा तालुक्यात २२, करमाळ्यात २१, बार्शीत २० तर मंगळवेढा तालुक्यात १५ घनमीटर काम झाल्याची नोंद झाली आहे.
- - जिल्ह्यातील २३५ गावे वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली होती, १५० गावांनी केलेल्या श्रमदानातून एक हजार ८२० कोटी लिटर पाणीसाठा होईल, असा अंदाज आहे.
- - भारतीय जैन संघटना, बालाजी अमाईन्स व अन्य संस्थांनी गावकºयांच्या कष्टाला मोठी साथ दिली.
- - झालेल्या कामामुळे उत्तर तालुक्यात ६४० कोटी लिटर, सांगोल्यात ४०० कोटी लिटर, माढ्यात २२० कोटी लिटर, करमाळ्यात २१० कोटी लिटर, बार्शीत २०० कोटी तर मंगळवेढा तालुक्यात १५० कोटी लिटर पाणीसाठा होईल, असे सांगण्यात आले.
सहभागी प्रत्येक तालुक्यातील टॉपचे काम असलेल्या चार गावांची तपासणी सुरू आहे. गावांनी भरलेली माहिती व तपासणीच्या अहवालावर बैठक होते. अशा तीन तपासणीनंतर गुणांक अंतिम होतात.-आबा लाडजिल्हा समन्वयक, पाणी फाउंडेशन