समीर इनामदारसोलापूर: पाण्याची किंमत तहानलेल्याच कळते असे म्हटले तरी तहान लागण्यापूर्वीच त्याची किंमत कळाली तर... सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पडणारा पाऊस, वापरले जाणारे पाणी आणि त्याचा होणारा गैरवापर पाहिले तर आपण पाण्याकडे अजूनही गांभीर्याने पाहत नाही, हे लक्षात येते.
सोलापूर जिल्हा आपण दुष्काळी म्हणून अनेक वर्षांपासून सांगतो. परंतु इतर जिल्ह्यांची स्थिती पाहिल्यानंतर सोलापूर जिल्हा हा पाणी वापराच्या बाबतीत ‘श्रीमंत’ असल्याचे दिसून येते. ज्या पद्धतीने पाण्याचा वापर इथले नागरिक करताहेत, ते मागील कटू अनुभव लक्षात घेताना दिसून येत नाहीत.
सोलापूर जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी पावसाचा गणला जातो. साधारणत: ५५० मि. मी. इतका पाऊस या कालावधीत पडतो, असे मागील अंदाजावरून सांगता येते. कधी तो सरासरीइतका पडतो तर काही वर्षी तो सरासरीपेक्षा खूपच कमी पडतो. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला म्हणजे सरासरी ४०७.२३ मि. मी. पाऊस पडला. ही सरासरी ८३ टक्के इतकी होती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून गणले गेलेले ‘उजनी’ धरणही तुडुंब भरले. पर्यायाने सोलापूर जिल्ह्याची भूजल पातळी काही प्रमाणात वाढली. याला कारणीभूत जलयुक्त शिवारांतर्गत करण्यात आलेली कामे आहेत, हेही विसरता येणार नाही.
गेली काही वर्षे पाण्यासाठी टँकरची वाट पाहणारी गावे त्याचवेळी देशात सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा असे परस्परविरोधी दृष्य जिल्ह्यात पाहावयास मिळाले. सोलापूर जिल्ह्यात आढळणारा खडक, पाणी साठवण्याची क्षमता आणि त्याचा वापर याचे प्रमाण पाहिले असता सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो हे निश्चित. मूळ अहवालानुसार उजनी धरणाची साठवण क्षमता ११०.७८ टीएमसी असून, वार्षिक पाणी वापर ८५.५९ टीएमसी आहे.
आता सुधारित प्रकल्प अहवालानुसार उजनी प्रकल्पाची साठवण क्षमता ११७.२५ टीएमसी इतकी असून, उपयुक्त पाणीसाठा ५३.५८ टीएमसी व वार्षिक पाणी वापर ८३.९४ टीएमसी इतका आहे. उजनीद्वारे सोलापूर शहर, करमाळा, पंढरपूर, कुर्डूवाडी, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, इंदापूर इत्यादी शहरांना नगरपालिका व महानगरपालिकेद्वारे एकंदरीत ४२६ गावे व ३५ लाख लोकसंख्येस पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. त्याशिवाय १३ औद्योगिक संस्था, २३ साखर कारखाने, एनटीपीसी यांना पाणीपुरवठा करण्यात येतो.
वाया जाणाºया पाण्याचे काय?- भारतामध्ये सुमारे ४१ हजार टीएमसी इतके पाणी समुद्राला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. त्याशिवाय भूजलाचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. याद्वारेही पाणी खूप वाया जाते. हे पाणी साठवून ठेवण्याची तयारी प्रशासनाने आणि नागरिकांनी करायला हवी. शेततळी, जलपुनर्भरण यांचाही वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा.