टेंभुर्णी : सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत मागील दोन-तीन दिवसापासून प्रतीक्षेत असलेला पालकमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अखेर मंगळवारी दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात ५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पूर्व नियोजनाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेसह पंढरपूर सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी १७ तारखेपासून उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडणे अपेक्षित होते. परंतु पालकमंत्र्याचा आदेश नसल्याने पाणी सोडण्यास विलंब होत गेला. अखेर मंगळवारी पालकमंत्र्याचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उजनी धरण प्रशासनाने दुपारी २ वा. पासून उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पातून प्रथम १६०० क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ केला. यानंतर दुपारी ३.३० सुमारास धरणाचे सहा दरवाजे ओपन करून त्यामधून २४०० क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. यामध्ये सायंकाळपर्यंत वाढ करून तो ३४०० क्युसेक करण्यात येणार आहे. विद्युत प्रकल्पाद्वारे १६०० क्युसेक व धरणाच्या दरवाजातून ३४०० क्युसेक असा एकूण ५००० क्युसेकने विसर्ग चालू राहणार असल्याचे धरण व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.