भीमानगर : चालूवर्षी उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असला तरी उजनी धरणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक महिना उशिराने मायनसमध्ये प्रवेश केला आहे.
उजनी पाणलोट क्षेत्रातील म्हणजेच भीमा खोºयातील धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे यंदा उजनी धरण १०० टक्क्यांपेक्षा जास्त भरले; मात्र बुधवारी सकाळी ९ वाजता उजनी धरणाने मायनसमध्ये प्रवेश केला आहे. अजूनही मे महिना निम्मा तर जून महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे़ उजनी धरण १०० टक्के भरले त्यावेळी पाणीसाठा ११७ टीएमसी होतो.
तसेच धरण १११ टक्के भरते त्यावेळी पाणीसाठा १२३ टीएमसी होतो. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीतील पाणीसाठा वजा ३७.९४ टक्के होता.हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आल्याने सध्या उजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष असते. आज विकासाची गती दिसून येते त्या मागील मूळ कारण आहे ते म्हणजे उजनी धरण आहे. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादनात आघाडी घेतली पयार्याने सर्वात जास्त ऊस कारखाने याच सोलापूर जिल्ह्यात उभे राहिले. कारखाने जास्त उभे राहिल्याने दळणवळणात क्रांती झाली. अनेक वेगवेगळ्या शेतीक्षेत्राशी निघडीत उद्योग व्यवसाय निर्माण झाले.
उजनीची सद्यस्थिती
- एकूण पाणी पातळी ४९०.९७५ मीटर
- एकूण पाणी साठा १७९१.९८ दलघमी
- उपयुक्त पाणी साठा वजा १०.८३ दलघमी
- टक्केवारी वजा ०.७१
- एकूण टीएमसी ६३.२८
- उपयुक्त टीएमसी वजा ०. ३८