आप्पासाहेब पाटील, सोलापूर: यंदा उन्हाळ्यात सोलापूरला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे सोलापुरात पाण्याची कमतरता भासत आहे. सोलापुरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा हाेत आहे. सध्या उजनी धरणात मायनस ३५.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक उरला आहे. मागील उजनी धरणातील पाणीपातळी याच काळात ४०. ७४ टक्के एवढी होती.
दरम्यान, सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सर्व धरणातील पाणीसाठा काही टक्केच शिल्लक राहिला आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा सध्या भरला आहे, हिप्परगा तलावात ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय एकरूख प्रकल्पात २३.२८ टक्के, हिंगणी प्रकल्पात मायनस ९.९१ टक्के, जवळगांव ०.७६ टक्के, मांगी ०.०० टक्के, आष्टी ११.८३ टक्के, बोरी मायनस १.७७ टक्के तर पिंपळगांवढाळे प्रकल्पात मायनस २.८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या सोलापूरला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे चटके बसत असून २१ गावात टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा हाेत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.