सोलापूर : स्मार्ट सिटीच्या उपक्रमातून सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीला पुर्नवैभव प्राप्त करून देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, इमारतीला विद्युत रोषणाई (लायटिंग) करण्यात आली असून सण, उत्सव काळात विविध प्रकारचा लूक पाहायला मिळणार असून यामुळे इंद्रभुवन इमारतीचे रंग उजळणार असल्याची प्रचिती सोलापूरकरांना लवकरच पाहावयास मिळणार आहे.
इंद्रभुवन इमारतीचे नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून, २६ जानेवारीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कार्यालये इंद्रभुवनात थाटणार आहेत. या इमारतीत खालच्या बाजूला कलादालन, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ऐतिहासिक अशा इंद्रभुवन इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मागील कित्येक वर्षापासून या इमारतीचे काम सुरू होते. अत्यंत कोरीव पद्धतीने ऐतिहासिक वारसा जपत कारागिरांनी नूतनीकरणाचे काम केले आहे. यासाठी ११० वर्षे जुन्या इमारतीला पुनर्वैभव प्राप्त करण्यात आले आहे.
इंद्रभुवन इमारतीला एलईडी व आरजीबी दिव्यांनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई कंट्रोलयुक्त असणार आहे. आपल्याला हवा असा लूक देण्याची सोय करण्यात आली असून स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला तीन रंगात (तिरंगा)चे रूप देता येणार आहे. शिवाय प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे रंगसंगती असणारे दिवे उजळणार आहेत.
सेल्फी अन् फोटोसाठी महापालिकेत गर्दीमागील दोन दिवसांपासून इंद्रभुवन इमारतीला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने महापालिकेचा परिसर सुंदर व नयनरम्य दिसून येत आहे. हे पाहण्यासाठी सोलापूरकरांची मोठी गर्दी होत असून अनेकांना इमारतीसमोर उभारून सेल्फी व फोटो घेण्याचा मोह आवरेनासा झाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरही इमारतीचे फोटो शेअर केले आहेत.
एलईडी व आरजीबी दिव्यांनी इंद्रभुवन इमारतीला विद्युत रोषणाई करण्याचे काम केले आहे. मुंबई महापालिकेला ज्या पद्धतीने लाइट्स लावण्यात आले आहेत, तशाच प्रकारचे हे लाइट्स आहेत. सण, उत्सव काळात ही रोषणाई विविध रंगात बदलता येणारे आहेत. यामुळे इंद्रभुवन इमारतीला एक वेगळी झळाळी येईल.- मुन्शी पंडित, मुख्य ऑर्किटेक्चर