१५ दिवसांपासून भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी, नागरिकांमधून करण्यात येत होती. नदीकाठच्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाईही जाणवू लागली होती. याशिवाय भीमा नदीतील पाण्यावर सांगोला, पंढरपूर शहर, मंगळवेढा, सोलापूर या शहरांसह काही पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत.
या सोडलेल्या पाण्याने भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या परिसराचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासोबत पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, सोलापूर या शहराच्या पाण्याचा प्रश्नही किमान एक महिना सुटण्याची चिन्हे आहेत.
नदीकाठची रोहित्रे उतरविली
उजनीतून भीमा नदीच्या पात्रात सोडलेले पाणी लवकर सोलापूरला पोहोचावे, यासाठी वीज वितरणने नदीकाठचा वीजपुरवठा काही कालावधी वगळता बंद ठेवला आहे. काही ठिकाणी तर शेतकरी सिंगल फेजवर पाणी उपसा करतील म्हणून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी रोहित्रेच जमिनीवर उतरवून ठेवली आहेत.