पंढरपूर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी रविवारी मध्यरात्रीनंतर पंढरपुरात दाखल झाले़ चंद्रभागेत पाणी आल्याने अधिकमासात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले़
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी आणि शेतीसाठी २९ मे रोजी पाणी सोडण्यात आले होते, मात्र प्रथम एका मोरीतून केवळ ५०० क्युसेक्स पाणी सोडले होते़ त्यानंतर त्यात वाढ करीत १ जूनपर्यंत ४१०० क्युसेक्स करण्यात आले़ उजनी धरणातून भीमा नदीत प्रथमच इतक्या कमी क्युसेक्सने पाणी सोडले होते़ सध्या उन्हाळ्यामुळे नदीपात्र ठिकठिकाणी कोरडे पडले आहे़ शिवाय वाळू उपशामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने हे पाणी पुढे सरकत नव्हते़ ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर टप्प्याने त्यात वाढ करण्यात आली़
रविवारी मध्यरात्रीनंतर पंढरपुरात हे पाणी दाखल झाले़ सध्या चंद्रभागा नदीपात्रात पाणी भरपूर असल्याने अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेले भाविक नदीपात्रात जाऊन पवित्र स्नान करीत असल्याचे दिसत आहे़
भाविकांच्या संख्येत होणार वाढ- उजनीतून पाणी येण्यापूर्वी पंढरपूर येथील बंधाºयातून पाणी सोडण्यात आले होते; मात्र ते कमी असल्याने अस्वच्छ पाण्यातच भाविकांना पवित्र स्नान करावे लागत होते़ तरीही भाविकांची मोठी गर्दी होती़ अधिक मास संपायला केवळ ९ ते १० दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने पंढरीत येणाºया भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ आता नदीपात्रात पाणी आल्याने पुन्हा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे़