मोडनिंब : मोडनिंब शहराला गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. याबाबत शहरातील सुमारे ४० महिलांनी हातात रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सरपंच नवनाथ मोहिते यांच्या टेबलसमोर उभ्या राहून आमच्या पाण्याची सोय करा म्हणून जोरदार मागणी केली. हे नाट्य तब्बल तासभर चालू होते. अखेर टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन सरपंच मोहिते यांनी दिल्यानंतर महिला शांत झाल्या. मंगळवारी सकाळी ११ वाजता सरपंच नवनाथ मोहिते, सदस्य शिवाजी सुर्वे, उदय जाधव, दत्ता सुर्वे, चांगदेव वरवडे, किरण खडके हे ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा करीत बसलेले होते. अचानक कमल सिरसट, अनुसया साळुंखे, रोहिणी दीक्षित, नंदा कुंभार, बेबीजान कोरबू, काशीबाई मस्के, नंदा व्यवहारे, रतन शिंदे, सोना लोंढे, शांताबाई पाटील, शालन देवळे, गीता कुंभार, सुमन कुंभार, साखरबाई शेंडगे, मंदा जाधव, चंदा जाधव, सुलोचना खडके, आनंदीबाई पिसे, शामल महामुनी, शोभा काळे, अश्विनी खडके, सुवर्णा निकम, अनिता भालेराव या महिला हातात रिकाम्या घागरी घेऊन आल्या आणि जोरदार घोषणाबाजी करु लागल्या. या महिलांनी सरपंच व सदस्यांना धारेवर धरले. आम्ही दररोज २०० लिटर पाणी ३० रुपयांना विकत घेत असल्याचे सांगितले. यावर सदस्य शिवाजी सुर्वे म्हणाले की, विकत पाणी घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, मात्र ग्रामपंचायतीची पाणीपट्टी भरली तर थकीत वीज बिल भरून पाणीपुरवठा सुरळीत करता येईल. यावेळी प्रशांत गिड्डे, नितीन गडधरे, सुनील ओहोळ, सुरेश लोंढे, फिरोज मुजावर, बंडू सुतार आदी उपस्थित होते.
---------------------------
यात्रेतही पाण्याचे हाल ४ सध्या मोडनिंबचे ग्रामदैवत वेताळ देवस्थानची यात्रा सुरू आहे. मात्र आंघोळीसाठी पाणीच नसल्याने नागरिकांसह आलेल्या पाहुण्यांचेही हाल सुरू आहेत
. ------------------
तर तुमच्यासाठी बांगड्या ४ तुम्हाला जर वेळेवर पाणीपुरवठा करता येत नसेल व स्वच्छतेकडे लक्ष देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा, अन्यथा या बांगड्या तुमच्यासाठी आणल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शोभा शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
--------------------------
सरपंचाच्या वॉर्डात पाणी ४ सरपंच नवनाथ मोहिते यांच्या प्रभाग चारमधील आदर्शनगर येथे पाच बोअर असून, विद्युत पंपाद्वारे सर्वांना दररोज मुबलक पाणी मिळत आहे. याच वॉर्डातील वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे सरपंचाच्या वॉर्डात पाणीटंचाई नाही, असे चित्र मोडनिंबमध्ये सध्या दिसत आहे.