पंढरपूर : शहर व तालुक्यातील सर्व भागांत शनिवारी रात्री आणि रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सखोल भागातील घराघरांत पावसाचे पाणी घुसले आहे. या पावसामुळे मोठी दैना उडाली आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी आले.
इंदिरा गांधी शॉपिंग सेंटरमध्ये, तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाचे पाणी शिरले आहे. शहरातील संभाजी चौक व आसपासच्या परिसरात तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले. गटारी तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर आले. तालुक्यातील ग्रामीण भागातही दमदार पावसाने हजेरी लावली. सुपली, पळशी उपरी, चळे, आंबे, कासेगाव आदी बहुतांश गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तब्बल ३२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पंढरपूर तालुक्यात रविवारी झालेले पर्जन्यमान मंडळनिहाय - करकंब ३८ मि.मी., पट कुरोली २२ मि.मी., भंडीशेगाव २७ मि.मी., भाळवणी २२ मि.मी., कासेगाव ४४ मि.मी., पंढरपूर ६४ मि.मी., तुंगत ४० मि.मी., चळे ५२ मि.मी., पुळूज १३ मि.मी., तर एकूण पाऊस ३२२ मि.मी. झाला, तर तालुक्यात सरासरी पाऊस ३५.७७ मि.मी. पाऊस झाला आहे.
---
प्रांत अधिकाऱ्यांकडून सतर्कतेच्या सूचना
पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. ओढे, नदीनाल्याकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना स्थानिक ग्रामपंचायती, तलाठी, पोलीस पाटील यांना देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
---
ओढे, नाल्यांची तहसीलदारांनी केली पाहणी
शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यामुळे ओढे, नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे ग्रामीण भागातील ओढ्या, नाल्यांची प्रांतअधिकारी सचिन ढोले व तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी पाहणी केली आहे. मागील वर्षी ज्या गावांमध्ये नागरिकांना पावसामुळे धोका झाला त्या नागरिकांनाही गावातील जिल्हा परिषद शाळा व इतर सुरक्षित ठिकाणी पाठविण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
----
फोटो : २७ पंढरपूर
पंढरपूर नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटरमध्ये साठलेले पावसाचे पाणी.