मोहोळ : शहरासाठी पिण्याचा पाणीपुरवठा करणार्या आष्टे-कोळेगाव बंधार्यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मोहोळ शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या परिसरात २४ तास चालणार्या शेकडो शेतीपंपांमुळे पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी मोहोळ ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सतीश काळे यांनी केली आहे. ३५ ते ४० हजार लोकसंख्येच्या मोहोळ शहराला आष्टे-कोळेगाव बंधार्यातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. बंधार्यात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंतच शहराला पाणीपुरवठा करता येणार आहे. बंधार्यातील पाणी संपल्यानंतर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येते, अशी परिस्थिती गेल्या २५ वर्षांपासून आहे, मात्र त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सध्या उन्हाचा पारा शिगेला पोहोचला आहे. उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी या बंधार्यात एक मे रोजी आडविण्यात आले होते. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन व शेतीपंपाचा उपसा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने चार मीटर इतके पाणी आडविले होते. परंतु २४ तास शेतीचे पंप चालू असल्याने केवळ २० दिवसातच अडीच मीटर पाणी संपले आहे. सध्या दीड मीटर इतके पाणी शिल्लक आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा व जून महिन्याचा विचार करता बंधार्यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सीना नदीच्या पात्रातून उजनीची तिसरी पाळी सोडण्यासाठी भीमा-सीना जोडकालव्याच्या लेव्हलला धरणाची पातळी आल्याने नदीद्वारे आता पाणी येणार नाही हे निश्चित असल्याने शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखून न ठेवल्यास ऐन जून महिन्यात मोहोळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायत व महसूल विभागाला याबाबत लेखी पत्र दिले आहे. मोहोळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही उपसरपंच सतीश काळे यांनी तहसीलदारांनी तातडीने नदी परिसरात वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले आहे.