सोलापूर : ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी ‘जागरण’ करावे लागत असल्याने लोकप्रतिनिधींनी ‘गोंधळ’ सुरू केला आहे. दोन दिवसांत हा विस्कळीतपणा दूर होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
उजनी आणि टाकळी पंपहाऊसमधील वीज पुरवठा मागील बुधवारी १२ तासाहून अधिक वेळ खंडित झाला होता. पंपहाऊसमधील वीज पुरवठा तासभर खंडित झाला की, शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळा किमान चार तासांनी पुढे जातात. घटस्थापनेपूर्वी शहरातील नागरिक घराच्या स्वच्छतेची कामे हाती घेतात. अनेक भागात पाणीच न आल्याने तारांबळ झाली. पाच दिवसांपासून विडी घरकूल, जुळे सोलापूर, शेळगी आदी भागात पाणीच न आल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.
बुधवारी सकाळी ११ वा.च्या दरम्यान साखरपेठ, भद्रावती पेठ, दाजीपेठ, अक्कलकोट रोड, जुळे सोलापूर या परिसरात पाणी सोडण्यात येईल, असे झोन कार्यालयांकडून सांगण्यात आले होते. साखरपेठेसह परिसरात सायंकाळी ४ नंतर पाणी सोडण्यात आले. मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. जुळे सोलापुरातील रजनी पार्क, गोकुळ नगर, ज्ञानेश्वर नगर, रुबी नगर, जगदंबा नगर, लक्ष्मी पार्क, नरसिंह नगर या भागातही पहाटे पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, सायंकाळपर्यंत अनेक भागात पाणी आलेच नव्हते. झोन कार्यालयाकडे विचारणा केल्यानंतर धीर धरा, पाणी येईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
पाणीपुरवठा उशिराने होईल, असे महापालिकेने जाहीर केले होते. मंगळवारी पहाटेपर्यंत अक्कलककोट रोड, विडी घरकूल भागातील नागरिक पाणी येईल याची वाट पाहत होते. मंगळवारी पाणी आले, पण कमी दाबाने, त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला.- गुरुशांत धुत्तरगावकर,नगरसेवक, शिवसेना.
जुळे सोलापुरातील नागरिकांनी पहाटे ५.३० वाजल्यापासूनच पाणी कधी येईल, याबाबत विचारणा करायला सुरुवात केली होती. सणासुदीचे दिवस पाहून वेळेवर पाणी येईल, असे नियोजन करणे आवश्यक होते. पाणीच न आल्याने लोकांचा संताप अनावर होणे सहाजिकच आहे. - संगीता जाधव, नगरसेविका, भाजप.