सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार आहे. टाकळी इनटेकमधील जलसाठा पाहता २५ मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून १५ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे, असे तिसरे स्मरणपत्र मंगळवारी मनपा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाला देण्यात येणार आहे.
उजनी धरणातून १५ जानेवारीला औज बंधाºयासाठी पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी २१ जानेवारीपर्यंत औज बंधाºयात पोहोचले. हे पाणी १० एप्रिलपर्यंत पुरेल, अशी आशा होती. परंतु, कर्नाटक हद्दीतून दररोज ७० एमएलडी पाण्याचा बेकायदेशीर उपसा सुरू झाला. तो रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क करावा, असे महापालिका प्रशासनाने कळविले होते. पण जलसंपदा विभागाने हात वर केले. यामुळे औज बंधाºयातील पाणी लवकर कमी झाले.
पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी औज बंधाºयात ०.६५ मीटर पाणी होते. बंधाºयातील पाणी टाकळी इनटेकमध्ये घेण्यात आले आहे. टाकळी इनटेकमध्ये ११ फूट पाणी आहे. हे पाणी २५ मार्चपर्यंत पुरेल, अशी आशा आहे. यादरम्यानच्या काळात १५ मार्चपर्यंत उजनीतून पाणी सोडण्यात यावे. हे पाणी २१ मार्चपर्यंत औज बंधाºयात येईल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाने यापूर्वी ५ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारीला पत्र पाठविले आहे. मंगळवारी तिसरे स्मरणपत्र पाठविले जाईल.
बेकायदेशीर पाणी उपशाचा बंदोबस्त कोण करणार?- महापालिका औज बंधाºयातून दररोज ९० एमएलडी पाणी उपसा करते तर कर्नाटक हद्दीतून दररोज ७० एमएलडी पाणी उपसा होतो. जलसंपदा विभागाने पाण्याच्या संरक्षणासाठी पावले उचलावीत, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात शहराला जादा पाणी लागते. मार्चनंतर पुन्हा मे महिन्यात उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होती. सध्या उजनीची पाणीपातळी खालावत आहे. एप्रिल महिन्यात बेकायदेशीर पाणी उपसा न रोखल्यास शहरावर जलसंकट ओढावणार आहे.