सोलापूर : गुढीपाडवा हा नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे़ यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात आहे़ भविष्यात प्रत्येकाला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले़.
हिंदू नववर्ष उत्सव म्हणजेच गुढीपाडवा़ या सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील प्रसिध्द पंचांगकर्ते ओंकार दाते यांच्याशी लोकमत च्या प्रतिनिधींनी संवाद साधला़ पुढे बोलताना ओंकार दाते म्हणाले की, गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस हा शुभच आहे़ यादिवशी संवत्सर आहे़ या संवत्सराचे नाव विकारी असे असून या वर्षात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असणार आहे़ त्याविषयी लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे़ येत्या नवीन वर्षात ६ जून, ४ जुलै व १ आॅगस्ट यादिवशी गुरूपुष्पामृत योग आहे़ १७ सप्टेंबरला एकच अंगारक चतुर्थींचा योग आहे.
गेल्यावर्षीपेक्षा यंदा गणेशोत्सव ११ दिवस लवकर म्हणजे ३ सप्टेंबरला येणार आहे. यावर्षी २७ आॅक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाचदिवशी असून २८ तारखेला दिवाळी पाडवा आणि २९ रोजी भाऊबीज असल्याने दिवाळी ३ दिवसांची असणार असल्याचेही दाते यांनी यावेळी सांगितले.