पंढरपूर : तालुक्यातील चिंचणी या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा यापुढे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे. प्रिसिजन उद्योगसमूहाच्या आर्थिक पाठबळावर राबविलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते झाले.
चिंचणीने प्रचंड मेहनत घेत निर्माण केलेल्या नैसर्गिक श्रीमंतीबद्दल सातपुते यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. प्रिसिजन कंपनीने १७ एच.पी.ची यंत्रणा बसवण्यासाठी २४ लाख रुपये खर्च केला आहे. संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेनुसार चिंचणीची वाटचाल सुरू असल्याचे सांगत स्वामी यांनी चिंचणीकरांची पाठ थोपटली. तसेच एक पद एक वृक्ष ही नवीन संकल्पना सोलापूर जिल्हा परिषद राबवणार आहे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी मिळून सर्व २० हजार झाडे लावण्याचा आणि ती झाडे जगवण्याचा संकल्प करीत आसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
यावेळी चिंचणीकरांनी इस्रायलप्रमाणे समूह शेतीचा पॅटर्न राबवावा, असे आवाहन शहा यांनी केले.
यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलीस निरीक्षक भस्मे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कटकधोंड, पिराची कुरोलीच्या सरपंच मुमताज शेख, उपसरपंच रणजित लामकाने, ग्रामसेवक मारुती भोसले, प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, समाधान काळे, चंद्रकांत पवार, शशिकांत सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.