कुर्डूवाडी : शहराला मुख्य जलवाहिनीच्या पंपगृहातून होणारा पाणीपुरवठा गेल्या चार-पाच दिवसांपासून गळती लागल्याच्या कारणावरून होऊ शकला नाही. ऐन पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीला गळती झाल्याने दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही असे नगरपालिकेच्यावतीने जाहीर केले आहे. परंतु पाच दिवस झाले तरी कुर्डूवाडी शहरात मात्र पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. यावर नगरपालिका पर्यायी पाणी व्यवस्थाही करीत नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत शहर व हद्दवाढ परिसरातील ४ हजार ५०० नळ धारकांना दररोज ५.५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा आवश्यक आहे. शहरापासून १८ किलोमीटर लांबीच्या पाईप लाईनद्वारे कुर्डूवाडीला पाणी पुरवठा होतो. या कामासाठी २२ कर्मचारी कार्यरत असतानाही कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
----
शहराला कायम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिका याबाबत नियोजन शून्य ठरली आहे. वारंवारच्या बिघाडामुळे दुसरी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. गेल्या पाच दिवसांपासून पाणी आले नाही.
- अतुल थिटे,
शिक्षक सोसायटी, कुर्डूवाडी.
----
शहरातील पाणी पुरवठा कायमच तांत्रिकदृष्ट्या बिघडलेला असतो.पाणी पुरवठा बाबत दुसरी शाश्वत व्यवस्था केली पाहिजे
-सुधीर मराळ, नागरिक, साई कॉलनी, कुर्डूवाडी
----
शहराचा पिण्याचा पाणी पुरवठा चालू झाला आहे. लवकरच तो शहरातील सर्व वॉर्डात नियमितपणे सुरळीत होईल. कंदरमध्ये पंपगृहात तांत्रिक बिगाड व पाईपलाईन गळती यामुळे शहरात पाणी टंचाई झाली होती. तो आता पूर्वत होतोय.
-अतुल शिंदे,कार्यालयीन अधीक्षक, नगरपालिका