टेंभुर्णी/ सोलापूर: सोलापूर शहरास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टेंभुर्णी शहरातील कुर्डूवाडी चौकाजवळ रोडचे काम सुरू असताना पोकलेन मशीनचा धक्का लागून पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटल्याने सुमारे दीड तास लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेमुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अधिक माहिती अशी की, सध्या टेंभुर्णी शहरातून गेलेल्या जुन्या महामार्गाचे नूतनीकरणाचे काम चालू आहे. त्यासाठी जुन्या रोडची जेसीबी व पोकलेन मशीनने खोदकाम केले जात आहे. हे काम चालू असतानाच गुरुवारी सकाळी खोदकाम चालू असताना रोडच्या कडेने जमिनीखालून गेलेल्या पाईप लाईनला धक्का लागून वॉल्व्ह तुटल्याने प्रचंड प्रेशरने पाईपमधील पाण्याचे कारंजे निर्माण झाले होते.
सुमारे दीड तास पाईपलाईन मधील पाण्याचे कारंजे उडत होते हे सर्व पाणी रोडवरून वाहत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला होता तसेच शहराच्या मध्यभागी हा प्रकार घडल्याने हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पाईप फुटल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेस कळवल्यानंतर उजनी धरणातील जॅकवेल वरील विद्युत मोटारी बंद करण्यात आल्या. यानंतर पाईपलाईन मधून उडणारे पाण्याचे कारंजे बंद झाले. तोपर्यंत रोडवरून लाखो लिटर पाणी वाहून गेले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"