सांगोला तालुक्यात एकूण १११३ पैकी ४७३ हातपंपांना केवळ ८ महिनेच पाणी असते. उन्हाळ्यातील ४ महिने हे पंप कोरडेच असतात. तर ४२४ हातपंप बारमाही असल्याने त्या पंपाना उन्हाळ्यात थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध असते. उर्वरित २१५ हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. मार्च महिन्यात पंचायत समितीच्या दहा कर्मचाऱ्यांनी मागणीप्रमाणे १११३ पैकी ५४ हातपंपाची दुरुस्ती केली आहे.
ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षांत टप्याटप्याने प्रत्येक वाड्यावस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविले आहेत. त्यातील बरेच हातपंप अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहेत. अनेक वर्षे वापर होत नसल्याने हातपंप गंजल्याचे पहावयास मिळत आहे. हातपंपाच्या देखभाल दुरूस्तीसाठी सांगोला पंचायत समितीने दोन वाहनांसह दहा कर्मचारी नियुक्त केले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकाकडून गाव, वाड्या-वस्त्यांवरील हातपंप नादुरुस्त असल्याची तक्रार पंचायत समितीला प्राप्त होताच कर्मचारी दैनंदिन चार ते पाच हातपंप दुरुस्त करून हातपंपाचा पाणीपुरवठा सुरळीत करीत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा मिळत आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::::::::
सांगोला पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामीण भागातील हातपंपाची दुरुस्ती करीत असल्याचे छायाचित्र.