सोलापूर : विविध कारणांमुळे बंद पडलेल्या दहा पाणीपुरवठा योजना टंचाईमुळे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी टंचाई आराखड्यातून निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
जीवन प्राधिकरण योजनेकडील चार योजना व जिल्हा परिषदेकडील ६ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून टंचाई काळात पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. बंद पडलेल्या या योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ७० लाखांची गरज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत या योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दुरुस्तीअभावी किंवा थकीत वीज बिलामुळे ज्या योजना बंद आहेत, अशा योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. या योजना सुरू केल्यास टँकरची गरज भासणार नाही, त्यामुळे या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जीवन प्राधिकरण योजनेकडील आंधळगाव, नंदूर (ता. मंगळवेढा), कोळगाव (ता. करमाळा), कव्हे या चार योजनांसाठी १ कोटी २० लाख रुपयांची गरज आहे. जिल्हा परिषदेकडील १९ प्रादेशिक पाणीपुरवठ्यांपैकी ८ योजना सुरु आहेत. त्यातील ६ योजना दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्यात व्होळे, कोर्टी, बोरगाव, जेऊर, भाळवणी, लिंबोरे या योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५० लाखांची गरज आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास २५ गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे ३६ टँकर देण्याची गरज भासणार नाही.
तलावात पाणी सोडण्याचे नियोजन च्दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे. टंचाई काळात विविध योजनेचे पाणी तलावात सोडून ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडीदारफळ, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी, मोहोळ तालुक्यातील आष्टी, सांगोला तालुक्यातील घेरडी तलावात विविध योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.