सोलापूर : टाकळी व उजनी जलवाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने सोमवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणी उपसा न झाल्याने पाणीपाळी एक दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय ऐनवेळी पाणीपुरवठा विभागाला घ्यावा लागल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले.
भीमा नदीवर औज बंधाऱ्यातून पाणी उपसा करणाऱ्या टाकळी पंपगृहातील वीज वाहिनीवरील पंप रविवारी दुपारी तुटला. यामुळे टाकळी पंपगृहाचा वीजपुरवठा सहा तास खंडित झाला. पंप सुरू नसल्याने पुरेसा पाणी उपसा होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे उजनी जलाशयातून पाणीपुरवठा करणाऱ्या पंपगृहाच्या वाहिनीवर इंदापूरजवळ अचानक समस्या निर्माण झाली. या बिघाड लक्षात आल्यावर वीज कंपनीने अचानकपणे शटडाऊन घेऊन बिघाड दुरुस्त केला. ब्लॅाक स्पॉट काढण्यासाठी वीज कंपनीच्या कामाला आठ तास लागले. त्यामुळे इतका वेळ पंप बंद असल्याने थेट उजनी जलवाहिनीवरील उपसा बंद पडला. दोन्ही ठिकाणाहून पाणी उपसा न झाल्याने सोमवारी शहर व हद्दवाढ भागात पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पाणी पाळी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे.
जुळे सोलापुरात तक्रारी
चार दिवसांनंतर पाणी न आल्याने अनेकांनी जुळे सोलापर पाणी टाकी येथे तक्रारी केल्या. मीरानगर भागातील पाणी वेळात बदल केल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पूर्वीप्रमाणेच पहाटे साडेपाचपासून पाणी सोडावे, अशी मागणी गुरण्णा हावशेट्टी यांनी केली आहे.