राकेश कदम
साेलापूर : महापालिकेचा कर थकविल्याप्रकरणी रेल्वे स्टेशन वगळता रेल्वेचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्या घरांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करावा, असे आदेश मनपा आयुक्त शितल तेली उगले यांनी साेमवारी संध्याकाळी पाणी पुरवठा विभागाला दिले. दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी पालिकेचा कर आकारणी अमान्य केली आहे.
मनपाच्या कारवाईबद्दल उपायुक्त आशिष लाेकरे म्हणाले, पालिकेने कर वसुलीसाठी अभय याेजना जाहीर केली हाेती. थकबाकीची रक्कम एकवट भरल्यास दंड, वाॅरंट फी पूर्णपणे माफ करण्यात येत हाेती. महापालिकेने रेल्वे विभागाला विविध मिळकतींचे दंडात्मक रकमेसह २२ काेटी रुपयांचे बिल दिले हाेते. अभय याेजनेचा लाभ घेतल्यास केवळ ८ काेटी रुपये भरावे लागतील असे कळविले हाेते. रेल्वेने या बिलांमध्ये पुन्हा दुरुस्ती सुचविली. त्यानुसार ३ काेटी रुपयांचे बिल देण्यात आले. परंतु, हे बिलही रेल्वेने अमान्य केले. केवळ ८ लाख रुपये पालिकेच्या खात्यावर जमा केले. पालिकेला हा भरणा मान्य नाही. मागील आठवड्यात प्रमुख अधिकाऱ्यांच्या घरांचा पाणी पुरवठा बंद केला हाेता. आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या घरांचा पाणी पुरवठा बंद हाेईल.