सोलापूर : उजनी, टाकळी पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने आणि पाकणी पंपगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शहरातील पाणी पुरवठा आजपासून सलग तीन दिवस विस्कळीत राहणार आहेत.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख गंगाधर दुलंगे म्हणाले, शहरास पाणी पुरवठा करणाºया उजनी व टाकळी पंपगृहाचा वीजपुरवठा शुक्रवारी आणि शनिवारी खंडित झाला होता. उजनी पंपगृहाचा विद्युत पुरवठा रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२.१५ पर्यंत खंडित झाला होता. टाकळी पंपगृहाचा विद्युत पुरवठा शनिवारी सकाळी ८.४५ ते दुपारी १२ पर्यंत खंडित झाला होता. उजनी व टाकळी येथील पंप सुरू होऊन पाणी पोहोचण्यास बराच कालावधी लागला.
उजनी पाईप लाईन आणि भवानी पेठ पंपगृहावर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा मंगळवारऐवजी बुधवारी होईल. टाकळी पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या परिसराचा बुधवारचा पाणी पुरवठा गुरुवारी होईल.
पाकणी पंपगृहात दुरुस्तीचे काम करणार- पाकणी पंपगृहातील सीटीपीच्या विद्युत यंत्रणेत रविवारी रात्री ११ ते दोन वाजेपर्यंत बिघाड झाला होता. या पंपगृहाच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाकणी पंपगृहावरुन पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होऊ शकणार नाही.
शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा- सध्या शहरात चार दिवसाआड पाणी येते. उजनी व टाकळीतील पंपगृहातील विद्युत बिघाडामुळे यात एक ते दोन दिवसांचा फरक पडणार आहे. विद्युत पुरवठा खंडित होणे, पंपगृहात बिघाड होणे, उजनी ते सोलापूरची पाईप लाईन फुटणे असे प्रकार वारंवार होतात. या कारणांमुळे अनेक भागात पाच ते सहा दिवसाआड पाणी येते. आता केवळ दोन ते तीन तास विद्युत पुरवठा खंडित होऊनही पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठ्याची वेळ आली आहे.