पंढरपूर : उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीपात्रात पोहोचले आहे. यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा लागला आहे.
उजनीतून भीमा नदीत १५ हजार क्युसेक तर वीज निर्मिती साठी १ हजार ६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर वीरमधून केवळ ३०० क्युसेकचा विसर्ग होत आहे. सोमवारी वीर धरणातून सोडलेले पाणी संगमला आल्याने व पावसाच्या पाण्याने नदी पाणी पातळी वाढली आहे. नरसिंहपूर येथील विसर्ग वाढत असून आता पंढरपूरमध्ये ही भीमा दुथडी भरून वाहण्यास सुरूवात झाली आहे.
उजनीचा विसर्ग २० हजार क्युसेकहून कमी करत १५ हजार करण्यात आला आहे. भीमा खोरे व उजनी पाणलोट क्षेत्रात पाऊस नाही. केवळ घोड धरणातून २५०० क्युसेक पाणी येत आहे. दौंडची आवक ६०६३ तर बंडगार्डनचा विसर्ग ४८९८ क्युसेक आहे. संगम येथे भीमा नदी सकाळी ३३ हजार ४६१ क्युसेकने वाहत होती. पंढरपूरचा विसर्ग १९ हजार ५०० क्युसेक होता.