अकलूज - वीर धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळे वीर धरणातून सांडव्याव्दारे निरा नदीत ४ हजार ४१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, उजवा कालवा विद्युत गृहातुन १ हजार ४०० क्युसेस तर डावा कालवा विद्युत गृहातुन ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग असे एकुण निरा नदीत ६ हजार ११८ क्युसेस पाण्याचा विसर्ग आज (शनिवार) दुपारी १२ च्या सुमारास करण्यात आला असुन नदीत काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वीर धरण प्रशासनाने दिला आहे.
गत सप्ताहापासून निरा नदीवरील वीर,भाटघर, गुंजवणी, निरा-देवघर धरण पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरु असुन सर्वच धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढत होत आहे. वीर-भाटघर धरणावर निरा उजवा कालव्यावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपुर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या व शेतीसाठी सिंचनाच्या योजना असल्यामुळे या चार तालुक्यासाठी वीर धरण व त्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने सुखद बातमी असुन सध्या सुरु असलेल्या पावसामुळे वीर धरण ९२ टक्के, भाटघर धरण ४९ टक्के, निरादेवघर धरण ४२ टक्के तर गुंजवणी धरण ६८ टक्के भरले आहे.
वीर धरणाची परिस्थिती पाहता वीर धरणावरील सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे तसेच वीर धरण ९२ टक्के भरल्याने सर्व सारासार विचार करता वीर धरण प्रशासनाने निरानदीत पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय करुन आज शनिवारी दुपारी १२ वाजता वीर धरणातून निरा नदीत ४ हजार ४१४ क्युसेस विसर्ग सांडव्याव्दारे सोडण्यात आला आहे. सांडव्यातुन उजवा कालवा विद्युत गृहातील १ हजार ४०० क्युसेस व डाव्या कालवा विद्युत गृहातील ३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग असे एकुण विद्युत गृहातील १ हजार ७०० क्युसेस व धरणातून ४ हजार ११४ असा एकुण ६ हजार ११८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सांडव्यातुन निरा नदीत सोडला आहे.