सोलापूर : सोलापूर-विजापूर महामार्गावरील टाकळी ब्रिज जवळ सीना नदीचे पाणी थांबल्याने सोलापूर- विजापूर महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. शुक्रवारी पहाटे पासून महामार्ग बंद आहे. त्यामुळे महामार्गावर हजारो गाड्यांची रांग लागली आहे.
ब्रिज जवळील महामार्गावर पाणी थांबल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे अपघात घडू नये, यामुळे काही काळ महामार्ग बंद ठेवल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सोलापूर विजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ब्रिज जवळील पाणी ओसरल्यानंतर महामार्ग सुरू होईल. त्यादृष्टीने प्रयत्न चालू असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परतीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. विविध नद्यांना पूर आले असून अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाला आहे.