सोलापूर: जिल्ह्यातील लसीकरणाला गती देण्यात येत असून १ हजार १३४ गावांपैकी ७१ गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सोमवारी दिली.
नवरात्र काळात जिल्ह्यातील लसीकरण घटले होते. लसीकरणाला गती देण्यासाठी मिशन कवच कुंडल मोहीम हाती घेण्यात आली. यात दोन लाख लसीकरणाचे उद्दिष्ट होते. सात दिवसात १ लाख ९० हजार लोकांचा पहिला डोस पूर्ण करण्यात आला. त्यानंतर हीच गती कायम राहण्यासाठी आता गावोगावी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. शेतातील वस्त्यांवरील लाभार्थ्यांसाठी मोबाईल व्हॅनचा वापर करण्यात येत आहे. मोबाईल व्हॅनलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-----
शंभर टक्के लसीकरण झालेली गावे......
अक्कलकोट: दहिटणेवाडी, हल्लाळी, बावकरवाडी, जेऊरवाडी, हंद्राळ, कुडल, हत्तीकणबस, रामपूर, बादाेले खु., केगाव, बार्शी: रातंजन, लाडोळे, सासुरे, शेळगाव आर, राळेरास, अरणगाव, धानोरे, पिंपळवाडी, धामणगाव, चुंब, बोयारे, अलीपूर, तावरवाडी, तडवळे, यावली, ढोराळे, दहिटणे, मुंगशी, इर्ले, इर्लेवाडी, शेळगाव, महागाव, माढा: लोणी, नदी, पळवण, निमगाव टे, सापटणे, तांबवे, ढवळस, जाकले, चव्हाणवाडी, धानोरे, कापसेवाडी, हटकरवाडी, बुद्रकवाडी, जमगाव, उंदरगाव, केवड, खैराव, निमगाव, सुल्तानपूर, महातपूत, विठ्ठलवाडी, जाधववाडी, वडाचीवाडी, माळशिरस : झांजेवाडी, उत्तर सोलापूर: मोहितेवाडी, खेड, नरोटेवाडी, सेवालालनगर, समशापूर, दक्षिण सोलापूर : राजूर, कुडल, चंद्रहाळ, चिंचपूर, वडकबाळ, खानापूर, शंकरनगर, यत्नाळ, अंत्रोळी, वडापूर.
-----
माढा तालुका अग्रेसर
लसीकरण पूर्ण करण्यात माढा तालुका अग्रेसर राहिला आहे. या तालुक्यातील २३ तर, बार्शीतील २२ गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्या खालोखाल अक्कलकोट व दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी १० गावे व उत्तरमधील ५ आणि माळशिरस तालुक्यातील एका गावात शंभर टक्के लसीकरण झाले आहे.
-----
पाच तालुके पडले मागे
सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, करमाळा आणि पंढरपूर तालुक्यातील एकही गाव शंभर टक्के झालेले नाही. या तालुक्यातही वाड्या आहेत. पण, लसीकरण संथगतीने होत आहे. त्यामुळे या तालुक्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.