माढा : शेजारी अन् मित्र परिवाराला कोरोनापासून काळजी घ्या.. पुन्हा येऊ म्हणत गावचा निरोप घेतला.. मुंबईला निघालेल्या उपळाई बुद्रूकमधील झुंजारे कुटुंबावर काळाने घाला घातला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात झुंजारे कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाला. या अपघाताने गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव वसंत झुंजारे (४१), आई उषा वसंत झुंझारे (६३), पत्नी वैशाली वैभव झुंझारे (३८) व मुलगी श्रेया वैभव झुंझारे (०५) हे मरण पावले आहेत. तसेच मुलगा अर्णव वैभव झुंझारे (११) हा जखमी झाला आहे.
डॉ. वैभव झुंजारे हे १२ वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मनमिळावू व प्रत्येकाला आपलेसे करणारे होते. त्यांच्या अपघाताने उपळाई बुद्रूक गावावर शोककळा पसरली आहे. ते सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक वसंत झुंजारे यांचे सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात वडील, एक मुलगा, भाऊ कुटुंबीय असा परिवार आहे.
मुलांची शाळा होताच कुटूंबाला घेऊन निघाले
नोकरीनिमित्त नवी मुंबईत वास्तव्यास असलेले झुंझारे कुटुंबीयाचा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उपळाई (खुर्द) येथे काही दिवस मुक्काम होता. मात्र डॉ. वैभव हे मागील काही दिवसांपूर्वी सेवेत रुजू झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच लहान मुलांची शाळा सुरु झाली. पुन्हा कुटूंबाला घेऊन ते मुंबईला निघाले होते. सोमवारी शेजार्यांबरोबर कुटुंबाने हुरडा पार्टीचा आनंदही घेतला. त्यानंतर त्यांनी मुंबईला जाण्याची तयारी केली. यावेळी शेजारी व्यक्तींना भेटून कोरोनापासून काळजी घ्या सांगत मुंबईला निघाले. सायंकाळच्या सुमारास कुटुंबीया मुंबईकडे जात असताना खोपोलीजवळ अपघात झाला.
फोटो : १६ वैभव झुंजारे ॲड. वैशाली वैभव झुंझारे
१६ श्रेया झुंझारे
१६ उषा झुंझारे