मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या किसान रेल्वेच्या वाहतूक सेवेला शेतकऱ्यांमधून मोठा प्रतिसाद मिळू लागला होता. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दोन पैसे मिळू लागले असतानाच कुर्डूवाडी व जेऊर स्थानकावरील लोडिंग बंद केले आहे. प्रतिसाद वाढल्यानंतर डब्यांची संख्या वाढणे अपेक्षित असताना ते कमी होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सांगोला येथून लोडिंग सुरू असले तरी सर्व शेतकऱ्यांना जागा उपलब्ध होत नाही. करमाळा, माढा, परांडा, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगोला येथे माल घेऊन जाणे गैरसोयीचे व जादा खर्चिक आहे. सध्या भाजीपाल्याचे दर फारच खाली आले आहेत. दिल्ली बाजारपेठेत माल गेल्यावर शेतकऱ्यांना दर चांगला मिळतो व उर्वरित शेतमालाला स्थानिक बाजारपेठेतही दर मिळेल. मात्र, किसान रेल्वे सुविधा बंद असल्याने शेतकऱ्यांना सध्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
----
कुर्डुवाडी व जेऊर स्थानकावर शेतमालाची दीडशे टनांपर्यंत आवक येते. अशावेळी जादा डब्यांची सोय करणे, आठवड्यातून दोनऐवजी तीन वेळा ही गाडी सोडणे अपेक्षित आहे. या दोन स्थानकांवरील लोडिंग बंद झाल्याने शेतकऱ्यांची लिंक तुटून मोठे नुकसान होणार आहे.
- किरण डोके, प्रगतशील शेतकरी, कंदर
---