करमाळा : संपूर्ण देशातच नव्हे तर जगात कोरोना रोगाने हाहाकार माजवलेला असताना करमाळा तालुक्यातील पोटेगाव, म्हसेवाडी व गुलमोहोरवाडी या तीन गावांतील ग्रामस्थांनी जागरूकता बाळगल्याने येथे अद्याप कोरोना पोहोचला नाही. गतवर्षीच्या पहिल्या लाटेत व आता दुसऱ्या लाटेत गावकऱ्यांनी व कारभाऱ्यांनी पाहुण्यारावळ्यांनाही क्वाॅरण्टाइन करूनच गावात घेण्याची दक्षता बाळगली.
कोरोना संसर्गजन्य रोगाची देशात दररोज लाखो लोकांना बाधा होत आहे. बाधित रुग्णावर इलाजासाठी हॉस्पिटलमधील बेड, यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर औषधांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत. देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना करमाळा तालुक्यातील पोटेगाव, म्हसेवाडी, गुलमोहोरवाडी या गावात अद्यापपर्यंत कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
स्थानिक पातळीवरील प्रशासनाने घेतलेली काळजी व ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता यामुळे गतवर्षीच्या पहिल्या लाटेत व आता सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत अद्यापपर्यंत या गावातील एकही व्यक्ती कोराना संसर्गाने बाधित झालेली नाही. तरटगाव, बाळेवाडी या गावात कोरोनाचे रुग्ण सापडले; पण पोटेगावमध्ये ग्रामस्थांनी मास्कचा वापर, नियमित स्वच्छ हात धुणे व सुरक्षित अंतर या नियमाचे काटेकोरपणे पालन केल्याने अद्याप कोरोनाचा पोटेगावात संसर्ग झालेला नाही.
सरपंच अजिनाथ नाईकनवरे, उपसरपंच बारीकराव जगदाळे, स्वस्त धान्य दुकानदार जगन्नाथ कुंभार, पोलीसपाटील बापू शिरगिरे, ग्रामसेवक सुशेन ननवरे, डॉ. अधेय जामदार, आरोग्यसेविका संगीता मंडलिक यांनी ग्रामस्थांची जनजागृती केली आहे. पांडे गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले; पण पांडे गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या म्हसेवाडीत अद्यापपर्यंत एकही बाधित रुग्ण आढळला नाही तशीच परिस्थिती तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या गुलमोहोरवाडी येथेही ग्रामस्थांची जागरूकता व तत्परता यामुळे गाव कोरोनापासून वंचित राहिले आहे.
----
गावात मास्कची सक्ती केली, कोणताही सामुदायिक कार्यक्रम घेतला नाही, ग्रामस्थांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले व बाहेरगावाहून आलेल्या पाव्हुणे, मित्रमंडळी यांच्यावर लक्ष ठेवून कॉरण्टाइन करण्याची विनंती केली. यामुळे आम्ही आजपर्यंत कोरोनापासून चार हात दूर आहोत.
- अजिनाथ नाईकनवरे, सरपंच पोटेगाव
----
करमाळा तालुक्यातील पोटेगाव, म्हसेवाडी, गुलमोहोरवाडी या तीन गावात अद्याप कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळळला नाही. गावकऱ्यांनी पाळलेला संयम, नियम व शिस्त यामुळे कोरोनाची बाधा झाली नाही. या गावात आता प्राधान्यक्रमाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
- डॉ. सागर गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी
फोटो मेल केला आहे. फोटो ओळी : पोटेगाव, ता.करमाळा येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांना सॅनिटायझर वाटप करताना सरपंच अजिनाथ नाईकनवरे व पदाधिकारी.
----
पोटेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांना सॅनिटायझर वाटप करताना सरपंच अजिनाथ नाईकनवरे व पदाधिकारी.