सोलापूर : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ यामुळे राज्य शासन लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता असताना मात्र सोमवारी शिक्षण विभागाच्या वतीने यंदा नेहमीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सुरू करणार असल्याचा मानस जाहीर केला़ या निर्णयाला बहुतांश पालकांकडून विरोध करण्यात येत आहे़ जोपर्यंत कोरोनावर पूर्णत: इलाज सापडत नाही किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, असे मत पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाचे सद्यस्थितीतील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालकांकडून विरोध केला जात आहे़ सध्या शहरातील अनेक भाग हे रेड झोनमध्ये आहेत़ या भागात शाळा, महाविद्यालयेही आहेत़ यामुळे त्या शाळेत विद्यार्थी जातील का, याचबरोबर जीव धोक्यात घालून शिक्षण शिकवणे योग्य आहे का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाळा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी आहेत़ ग्रामीण भागात शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे़ अशा वेळी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता येणे कठीण आहे़ याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक शाळा, महाविद्यालये हे क्वारंटाईन केंद्र म्हणून घोषित केले आहे़ हीे केंद्रे रिकामी करण्यात अडचणीही आहेत.
मुलांचे शिक्षण हे महत्त्वाचे आहे. सोबतच त्यांचे आरोग्यही खूप महत्त्वाचे आहे़ यामुळे सद्यस्थितीत शाळा सुरू करणे, हे खूप गडबडीचे ठरू शकेल़ जर शासनाने या कालावधीत शाळा सुरू केल्या तर आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी आरोग्य धोक्यात घालून शाळेला पाठवणार नाही.
- मनोज कुलकर्णी, पालक
सोलापूर शहरात रेड झोन आहे़ अशा भागात शाळा भरवणे हे चुकीचे आहे़ ग्रामीण भागात एक दिवसाआड शाळा सुरू करण्याचा नवा पर्याय आहे़ याचबरोबर सरकारी वाहिन्यांच्या माध्यमातून शाळा वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षणाचा विचार करावा किंवा सध्या आहे त्या साधनांचा उपयोग करून त्या माध्यमातून शिक्षण द्यावे़- तानाजी माने, शिक्षण तज्ज्ञ
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे. पण त्या आधी मुलांची आणि पालकांच्या मनाची पूर्णत: तयारी होणे गरजेचे आहे. सध्या इतर देशात आठवड्यातून एक किंवा दोन दिवस शाळा सुरू केली जात आहे़ त्याप्रमाणे किंवा ट्यूशनसारख्या बॅचेसच्या माध्यमातून शाळा सुरू करता येतील़ याचबरोबर जर शाळा सुरू करायची असेल तर जूननंतरच करावी़ तोपर्यंत विद्यार्थ्यांचे नोट्स आणि शाळा स्वच्छता करण्यासाठीचा वेळ शिक्षक आणि कर्मचाºयांना मिळेल.- सायली जोशी, संस्थाचालक, आयएमएस