सोलापूरः राष्ट्रवादीनं माळशिरस या मतदारसंघातून उत्तम जानकरांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी अजित पवारांनी प्रचारसभा घेतली आहे. यावेळी अजितदादांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजितदादा म्हणाले, मी जे बोलतो ते करतो, वचनपूर्तीचं राजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. याची जाणीव माळशिरसकरांनो डोळ्यांसमोर ठेवा. तसेच आम्हाला सत्ता द्या, पहिल्या तीन महिन्यांच्या आत नाय तुमचा सातबारा कोरा केला, तर पवाराची औलाद सांगणार नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत. तीन तीन वर्षं कर्जमाफी यांच्या काकांनी केली होती काय?, हिरवी यादी, पिवळी यादी आणि लाल यादी, पिवळी झाली तरी हिरवी यादी येत नाही. मीसुद्धा संस्था चालवलेल्या आहेत, हे सरकार शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे देत नाही. गेल्या पाच वर्षांत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात हे या सरकारचं पाप नाही काय?, शेतकरी आत्महत्या का करतो, त्यांच्या धान्याला भाव नाही. त्यांच्या भाजीपाल्याला भाव नाही. त्यांच्या फळांना भाव नाही. त्याला मदत होत नाही.यांना पिकांवर रोग कुठला पडतो तेच कळत नाही, त्यांना शेतीतलंच काही कळत नाही, ते मदत कसली करणार?, असं म्हणत अजित पवारांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. तसेच कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा हवाला देत अजित पवार म्हणाले, अरे तुम्ही माणसांना मारायला निघालात, एवढी नशा आणि धुंदी आली आहे काय?, जनता एखाद्याला निवडून देते, त्याला पाडायचंही धारिष्ट्य ही जनता दाखवू शकते, याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे.
सोलापूर जिल्हा बँकेची अवस्थाही बिकट आहे. ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर पांघरून घालायचं आणि विरोधात असलेल्यांना त्रास देण्याचं काम करायचं, या प्रकारचं काम सत्ताधाऱ्याचं चाललंय. मुंबईत आरेमध्ये एका रात्रीत कितीतरी झाडंच कापून टाकली आणि त्यातच शिवसेना म्हणते आम्ही बघून घेऊ. तिथे वाट लागली आणि हे म्हणतात आम्ही बघून घेऊ. किती दिवस खिशात त्यांचे राजीनामे होते, त्यांचं काहीएक ऐकलं जात नाही. नुसतंच बघून घेतो, बघून घेतो सांगतायत. एवढीच धमक होती तर सरकार पाडायचं होतं ना?, त्या नगरच्या खासदारानं सांगितलं कमळाचं बटन दाबणार तरच दोन हजार रुपये घ्या, ते दोन हजार काय त्या खासदाराच्या बापाच्या घरचे आहेत काय, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केलाय. सत्तेचा माज कुठेतरी उतरवला पाहिजे.