काशिनाथ वाघमारे
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धमान नगरातील शांत वातावरण, मात्र एका कुटुंबात धावपळ दिसली...मंगलाष्टका कानी पडल्या...घराबाहेर तर कोणीच नाही़ सनई चौघडे नाहीत, ना बँड, ना वरात...ना पंगती झडल्या... मास्क बांधलेल्या भटजीबुवांसह केवळ तीनच लोकांच्या साक्षीनं वधू-वराचं लग्न लागलं...अक्षता पडताच दोघेही सासरी बुलेटवरुन काही क्षणात स्वार झाले.
कोरोनाच्या दडपणाखाली हा छोटेखानी विवाह सोहळा रंगला वर्धमान नगरात बसुदे-पाटील यांच्या कुटुंबात. रुपाभवानी मंदिर परिसरात वर्धमाननगर येथील नागनाथ बसुदे-पाटील यांची मुलगी तृप्ती ही शिक्षण घेत असताना तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी (उस्मानाबाद) येथील मुलाचे स्थळ आले.
सूरज संजय शिनगारे असे त्या इंजिनिअर मुलाचे नाव असून, जवळपास सात महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडाही उरकला होता. त्यानंतर १६ एप्रिल लग्नाचा मुहूर्त ठरला.त्यानंतर दोन्ही कुटुंबातील लोकांकडून उत्साहाच्या भरात खरेदीला सुरुवात झाली. मंगल कार्यालयही बुक केले. मात्र तारीख जवळ आली आणि कोरोनाच्या संकटाने दोन्ही कुटुंबाच्या आनंदावर विरजन टाकले.
यातूनही दोन्ही कुटुंबाने मार्ग काढला आणि ५ मे रोजी मुलीच्याच घरी विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. अन तसेच झाले...मंगळवारी दुपारी १२.३० वाजता केवळ भटजी, मुलीचे आई-वडील या तिघांच्याच साक्षीनं तृप्ती आणि सूरजचा विवाह सोहळा रंगला़Þ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घातलेले नियम पाळत वधू-वरांनी आणि त्या इतर तिघांनी तोंडावर मास्क बांधून विधी पार पाडला़. दोघांनीही एकमेकांना हार घालत विवाह बंधनात अडकले.
दोन तासात वानेवाडी गाठली...- हा विवाह सोहळा खूप कमी वेळेत पार पडला. अक्षता पडताच पुढील विधी भटजीबुवाने लवकरात लवकर उरकले तत्पूर्वी बसुदे-पाटील यांनी पोलिसांकडून परवानगीही घेतली होती़. अक्षतानंतर दोन तासात या वधू-वराने घर सोडले दोघेही दोन तासात बुलेटवरुन वानेवाडी गाठली. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने संचारबंदीत तृप्तीची मोठी बहीण आणि नातेवाईक यापैकी कोणीच या सोहळ्याला हजेरी लावू शकले नाहीत.