माळशिरस तालुक्यात गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीसाठा पुरेसा ठरला. यावर्षी लवकरच पावसाने तालुक्यात हजेरी लावल्यामुळे बळीराजा आनंदित झाला होता. खरीप हंगामातील उत्पन्नाबाबत आशादायी असतानाच पेरणीसाठी आवश्यक असणाऱ्या पावसाने अद्यापतरी चकवा दिला आहे; मात्र काही मोजक्या गावात चांगला पाऊस पडल्यामुळे पेरणी केली आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पेरणीयोग्य पाऊस नाही. सध्या ढगाळ हवामान, विजांचा कडकडाट व रिमझिम पाऊस असे पावसाळी वातावरण तयार होत आहे; मात्र अद्यापही खरीप हंगामाच्या दृष्टीने पुरेसा पाऊस तालुक्यात पडल्याचे दिसून येत नाही.
असा पडला पाऊस
चालू आठवड्यात जास्तीत जास्त ७७ मि.मी.पर्यंत एका दिवसात पाऊस पडला. त्यात लवंग मंडलमध्ये ३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. बहुतांश मंडलमध्ये ० मि.मी.ची नोंद झाली. २८ जून रोजी तालुक्यातील माळशिरस १ मि.मी., सदाशिवनगर ० मि.मी., इस्लामपूर ०० मि.मी., नातेपुते ०० मि.मी., दहिगाव ४ मि.मी., पिलीव ११ मि.मी., वेळापूर ३ मि.मी., महाळुंग ३ मि.मी., अकलूज १ मि.मी., लवंग ३ मि.मी. अशी एकूण २६ मि.मी. सरासरी पावसाची मंडलनिहाय नोंद झाली आहे.