सोलापूर : लग्न हा आयुष्यातील सर्वात सोनेरी क्षण! या क्षणाची उत्कंठा सर्वांनाच असते. मात्र या आनंदाच्या क्षणातही लोकशाहीतील मतदानाच्या कर्तव्याचा विसर न पडून देता बोहल्यावर चढण्यापूर्वी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील गौडगाव येथील नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला.
स्वप्नील माधव बोंगे असे या नवरदेवाचे नाव आहे. बारावीपर्यंत शिक्षण झालेला हा तरूण गावात स्वत:ची १५ शेती कसतो. बार्शी तालुक्यातील गौडगाव हे गाव उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात येते. या २२ वर्षीय तरूणाच्या लग्नाचा मूहूर्त गुरूवारी दुपारी १२.३० वाजता होता. तुळजापूर तालुक्यातील कात्री येथील आरती अरगळे या तरूणीशी त्याचा विवाह झाला. विवाहापूर्वी स्वप्नीलची वरात गावातून सकाळी १० वाजता वाजत-गाजत निघाली.
हनुमान मंदिरात दर्र्शनासाठी वरात जात असताना वाटेत गौडगाव मतदान केंद्र क्रमांक ४० लागले. हे दिसताच नवरदेवाने एकाएकी वरात थांबविण्यासाठी सांगितले. वरात थांबताच नवरदेवाने थेट मतदान केंद्र गाठले. स्वत: जावून नाव शोधले आणि रितसर प्रक्रिया पार पाडून इव्हीएमचे बटन दाबले. ‘आधी लगीन लोकशाहीचे, मग माझे’, असे म्हणत राष्टÑीय कर्तव्याला प्राधान्य देणाºया या तरूणाचे वºहाड्यांमध्ये कौतूक सुरू आहे.