जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शहरात व गावात आठवडे बाजार भरवू नये असे आदेश दिले आहेत. मात्र ४ मे रोजी या आदेशाची पायमल्ली करत व्यापाऱ्यांनी बाजार भरविला. नागरिकांनीही खरेदीसाठी गर्दी केली होती. याबाबत दुधनी नगरपालिका व पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली. त्यानंतर पथक दाखल होऊन बाजार बंद करीत व्यापारी व ग्राहकांना हाकलून लावले. पथक येताच अनेकांची पाळपळ सुरू झाली.
नगरपालिकेचे चिदानंद कोळी, एम. एस. म्हेत्रे, सी. बी. पाटील, सुधीर सर्वगौडा, राजेंद्र गुंड, आर. एस. अत्ते, मौला गायकवाड, पोलीस सुरेश लामजाने, अंमलदार जाधव यांनी ही कारवाई केली.
पथक येताच बाजार उठला
दुधनीत मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून किराणा, भाजीपाला, फळे विक्री करण्याऱ्या व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली. खरेदीसाठी ग्राहकांनीही गर्दी केली. यात सर्वांनाच कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून आले. फिजिकल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. पोलीस प्रशासन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी गर्दी करू नका, असे आवाहन करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत गर्दी केली होती. मात्र काही वेळेतच नगरपालिका व पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी बाजार उठवला. दरम्यान, २२ शेतकरी, व्यापारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करून २ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
फोटो
०४दुधनी-बाजार
ओळी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करीत दुधनीत मंगळवारी आठवडे बाजार भरवण्यात आला होता. खरेदीसाठी नागरिकांनीही गर्दी केल्याचे दिसून आले.