मारुती वाघमोडनिंब : ‘मोठ्या प्रमाणात जमीन असून लागवडीचे तंत्र नसेल तर त्या शेती करण्याला काही अर्थ नाही’ हे वाक्य तरुण शेतकºयाला भेडसावत होते़ त्यांनी काही ठिकाणी फिरून आधुनिक पीक लागवड, नियोजन याची माहिती घेतली़ पीक नव्हे तर प्रयोगाच्या माध्यमातून पीक घेण्याचा प्रयत्न केला़ पाण्याचे नियोजन करून शेटफळ येथील एका तरुण कांदा उत्पादकाने अवघ्या तीन एकरात २१ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.
समाधान विश्वनाथ गुंड असे त्या तरुण शेतकºयाचे नाव असून, त्यांनी शेटफळ (ता़ मोहोळ) येथील शेतात केलेल्या प्रयोगाच्या निरीक्षणासाठी अनेक शेतकरी येताहेत. जेमतेम दहावी शिकलेल्या या तरुणाला नोकरी मिळत नसल्याने पारंपरिक शेतीकडे ओढा निर्माण झाला़ त्यामध्ये यशस्वी प्रयोग केले.
वडिलोपार्जित शेतीत अपुºया पाण्यावर घेतलेल्या उत्पन्नाला भाव कसा मिळेल, हा प्रश्न भेडसावत होता़ असे अनेक प्रश्न समोर असताना महादेव गुंड यांनी साडेतीन एकरात कांदा लावण्याचा निर्णय घेतला़ कांदा लावण्यापूर्वी त्यांनी बियाणे शेतात टाकून रोप तयार केले़ त्यांनी शेतामध्ये चांगल्या पद्धतीची खोलवर नांगरट केली़ त्यात दोन पाळ्या टाकल्या व बोध सोडण्यात आले़ त्यावर ड्रीप अंथरुन संपूर्ण भोद गार करण्यात आले़ त्यानंतर घरीच कांद्याची रोपे तयार केली.
१० सप्टेंबर रोजी महिला मजुरांद्वारे या रोपांची लागवड केली़ त्यानंतर मजुरांमार्फ त एक खुरपणी केली़ तसेच १८:४६ चा पहिला डोस १५ दिवसात दिला़ दुसरा डोस १०:२६ आणि युरिया टाकून पाणी दिले. त्यानंतर त्याची चांगली वाढ व्हावी म्हणून ००५० पोटॅश विद्राव्य खत देण्यात आले़ त्यानंतर थ्रिप्स व करपा बळावू नये म्हणून चार फवारण्या करण्यात आल्या़ कारण कोणत्याही पिकाला हवामान अनुकूल नसल्यामुळे पिके रोगाला बळी पडत होती़ त्यामुळे फवारणी करण्यात आली़ या फवारणीमुळे कांदा अतिशय चांगल्या प्रतीचा मिळाला़ तसेच तो रोगाला बळी पडला नाही.
१२० दिवसांनंतर काढलेला कांदा चिरून वाळविला - १२० दिवसांनंतर कांद्याची काढणी करण्याचा निर्णय घेतला़ १४ डिसेंबर रोजी मजुरांमार्फत कांदा उपटून चिरून तो चांगल्या प्रकारे वाळवले़ नंतर तो पिशव्यांमध्ये भरून मोडनिंब व सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आला़ यावेळी टप्प्याटप्प्याने पाठवलेल्या कांद्याला ४,७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला़ साडेतीन एकर क्षेत्रातून ४५ टन कांदा निघाला़ त्यापासून २१ लाख रुपये मिळाले़
दरवर्षी कांद्याची लागवड करतो़ एखाद्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला तर मागचा-पुढचा सगळा खर्च, तोटा निघतो़ मात्र यंदाच्या वर्षी अतिशय चांगला भाव मिळाल्यामुळे भरघोस उत्पन्न मिळाल़े तसेच आणखी दोन एकर फुरसुंगी कांदा काढणीस आलेला आहे़ या दोन एकरामध्ये ३० टन कांदा निघण्याची शक्यता आहे़ याला सरासरी दोन हजार रुपये क्विंटल भाव मिळाला तरी आणखी सहा लाख रुपये मिळतील़ पुढील काळात प्रयोशील शेती अवलंबून आपली प्रगती साधावी.- समाधान गुंड,कांदा उत्पादक शेटफळ