रेल्वे विभागाकडून शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेसचे कुर्डूवाडी जंक्शनवर शहरवासीयांनी जंगी स्वागत केले. शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता या नव्या गाडीचे आगमन झाले.
या गाडीमुळे येथील व्यापारी वर्गाबरोबरच मराठवाड्यात व झारखंडकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांनाही सोईस्कर झाले आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता येथील स्थानकावर नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेसचे आगमन झाले. यावेळी शहरवासीयांच्या व जिल्हा प्रवासी संघाच्या वतीने इंजिनास श्रीफळ वाढवून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी हार व पेढे वाटून स्थानकात आनंद साजरा करण्यात आला. यावेळी अरुण कोरे यांच्या हस्ते स्टेशन प्रबंधक रामकिसन चौधरी, लोकोपायलट अनिल क्षीरसागर, सहायक लोकोपायलट भीमासिंग मिना, गार्ड एन. ए. कुटे यांचा शाल, हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हर्षद मोरे, जनरल स्टेशनरी असोसिएशनचे संतोष दोशी, कापड व्यापारी संघटनेचे सुनील पूर्वत, किरण दोशी, उद्योजक महेश गांधी, राजेश गांधी, सराफ असोसिएशनचे डॉ. जी. के.धोका, किराणा दुकान संघटनेचे फडे, डॉ. संतोष दोशी, डॉ. हर्षद शहा, सामाजिक कार्यकर्ते हरीष भराटे, प्रवासी संघटनेचे महेश शेंडे, शांतीभाई पटेल, नितीन पापरीकर, नितीन दोशी, अजित पूर्वत, अनुप दोशी यांच्याबरोबर शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ-
१९कुर्डूवाडी-रेल्वे
शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेसचे कुर्डूवाडी जंक्शनवर शुक्रवारी मोठ्या उत्साहात स्वागत करताना प्रवासी संघाचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग व इतर संघटनेचे पदाधिकारी वर्ग.
---