सोलापूर : फटाक्यांची आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी आणि ढोलीबाजाचा ठेका अशा जल्लोषी वातावरणात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी सोलापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी सेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह जोरदार शक्तिप्रदर्शन केले.करमाळा आणि बार्शी येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला जाण्यासाठी ठाकरे यांचे दुपारी येथील विमानतळावर आगमन झाले. आपल्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते सकाळी अकरा वाजल्यापासून विमानतळावर जमले होते. आसरा चौक ते विमानतळ हा मार्ग शिवसैनिकांनी गजबजून गेला होता. रस्त्याच्या दुभाजकांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. चौका-चौकात ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी त्या त्या भागातील नगरसेवक, स्थानिक नेते कार्यकर्त्यांसह जमले होते. दुपारी १.०५ वाजता ठाकरे यांचे विमान सोलापूरच्या हवाई क्षेत्रात दिसताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. शिवसेना आणि ठाकरे यांच्या जयघोषाने विमानतळ परिसर दणाणून निघाला.ठाकरे यांचे विमान १.१२ मिनिटांनी सोलापूर विमानतळावर उतरले तेव्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर, शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे -पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, गणेश वानकर, साईनाथ अभंगराव, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, महिला आघाडीप्रमुख अस्मिता गायकवाड, शांता जाधव, पालिकेतील गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांनी ठाकरे यांचे स्वागत केले. ठाकरे यांच्यासमवेत पक्षाचे नेते रामदास कदम हेही सोलापूर दौऱ्यावर आले असून, विमानतळावरून हे दोघेही नेते करमाळ्याकडे रवाना झाले.--------------------------इच्छुकांची पोलिसांना काळजी!ठाकरे यांच्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. विमानतळाच्या प्रांगणातून धावपट्टीकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारातून प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश दिला जात नव्हता. प्रमुख पदाधिकारी वगळता अन्य कोणाला प्रवेश दिला जात नव्हता; पण इच्छुकांसाठी पोलिसांनी मुभा दिली होती. कोणी दामटून प्रवेशद्वारातून धावपट्टीकडे जात असला तर पोलीस त्या व्यक्तीला उमेदवार आहात का? असे विचारायचे. होय म्हटलं की पोलीस त्या व्यक्तीला आत सोडायचे. पोलिसांनी इच्छुकांसाठी घेतलेली ही काळजी विमानतळावर चर्चेचा विषय होता.------------------------------------राणेंविरोधी घोषणाबाजीराज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेचा संताप सोलापूरच्या शिवसैनिकांनी विमानतळावर व्यक्त केला. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा जयजयकार करीत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी राणेविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.--------------------------------दीड तास उशीरशिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे रविवारी सकाळी ११ वाजता सोलापूर विमानतळावर येणार होते; मात्र ते तब्बल दीड तास उशिरा आले़ शिवसैनिकांना त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी दीड तासाची प्रतीक्षा करावी लागली़ एक वाजता त्यांचे विशेष विमानाने आगमन झाले़ विमानतळावर आणि बाहेर शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती़आसरा चौकातही त्यांचे स्वागत करण्यात आले़ प्रसिद्धीमाध्यमांशी काही न बोलता ते करमाळ्याकडे सभेसाठी लगेच रवाना झाले़
उद्धव ठाकरेंचे सोलापुरात स्वागत
By admin | Published: July 21, 2014 1:29 AM