मोडनिंब : बारामती येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटायला पालक गेल्याची संधी साधत चाेरट्यांनी रोख २५ हजार रुपयासह दागिने आणि चांदी पळविल्याची घटना मोडनिंब येथे दत्तनगर भागात घडली. मंगळवार, २६ एप्रिल रोजी भरदुपारी ही घटना घडली. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, मोडनिंब येथील दत्तनगर भागात राहणारे गोविंदराव सदाशिव यादव हे मंगळवारी सकाळी ९ऊ वाजताच्या सुमारास राहत्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप लावून बारामती येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी बाहेर पडले. हीच संधी साधून चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. कपाटातील रोख २५ हजार रुपये, दीड तोळे सोने आणि १०० ग्रॅम चांदी असा ऐवज चोरून पोबारा केला.
सायंकाळी यादव कुटुंब घरी आल्यानंतर त्यांना बंगला फोडल्याचे लक्षात आले. लोखंडी कपाटातील कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. दागिने व रोकड घेऊन गेल्याचे निदर्शनास येताच पोलीस कर्मचारी शिवाजी भोसले व असिफ आतार यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. याबाबत यादव यांनी टेंभुर्णी पोलिसात रात्री उशिरा फिर्याद दिली.
चोरट्यांच्या साेयीची झाडे हटवा
ही घटना ज्या भागात घडली त्या भागात सुबाभुळची झाडे वाढली आहेत. अनेकांच्या रिकाम्या प्लॉटमध्येही झाडे वाढली आहेत. चोरट्यांना लपण्यासाठी या झाडांचा उपयोग होत आहे. ही झाडे तात्काळ काढावीत, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.