पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा पाहता दिवंगत आ. भारत भालके यांच्या कुटुंबातील त्यांचे पुत्र किंवा पत्नीलाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांतून होत आहे. मात्र भालके यांच्या अंत्यविधीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राेहित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत स्पष्ट न बोलता योग्यवेळी निर्णय घेऊ, असे सांगत उमेदवारीसंबंधी सस्पेन्स ठेवला होता.
आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यासाठी मतदारसंघातील इच्छुकांसह पक्षीय पातळीवर वेगवान हालचाली घडत आहेत. भालके कुटुंबाला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा असली तरी मतदारसंघातील दुसरे प्रमुख दावेदार परिचारक कुटुंबातील आ. प्रशांत परिचारक, युटोपियनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गठीभेटी वाढल्या आहेत. खा. पवार सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना उमेश परिचारक यांनी व्यासपीठावर जाहीर हजेरी लावली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात मेळावा घेत दोन्ही परिचारक बंधू लढणार नसतील तर त्यांचे पुतणे प्रणव परिचारक यांनी निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
उद्योगपती समाधान आवताडे हे भाजपचे निकटवर्तीय असले तरी आपल्याला भाजपासह राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत ऑफर असल्याचे जाहीर वक्तव्य करून त्याबाबत त्यांनी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांशी गाठीभेटी वाढविल्या आहेत. मतदारसंघातही ते ग्रामपंचायत निवडणूक, साखर कारखाने व सार्वजिनक कामाच्या निमित्ताने याविषयी चाचपणी करताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने पुन्हा या जागेवर दावा ठोकत आघाडीतून शिवसेनेला ही जागा सोडावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली आहे. शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेऊन महाविकास आघाडीतून आमच्या नावाचा विचार करण्याची मागणी केली होती. शिवाय उद्योगपती अभिजीत पाटील यांच्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सर्वश्रुत आहेत.
असे असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मात्र उमेदवारीबाबत कोणासमोरही स्पष्ट न बोलता जे जे भेटायला, उमेदवारी मागायला जात आहेत, त्यांना आमच्याकडे तीन-चार नावांचा विचार सुरू आहे, असे सांगत आहेत. मात्र ती चार नावे कोणती? उमेदवारीबाबत पवार कोणाला प्रथम पसंती देणार याबाबत मतदारसंघात तर्कवितर्क लढविले जात आहेत. सध्या तरी महाविकास आघाडीतच राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्यामध्येच उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
‘पार्थ’च्या नावाबाबत चाचपणी सुरू
पदाधिकारी निवडीवरून पंढरपूर तालुका राष्ट्रवादीत रणकंदन माजले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीतील उमेदवारी, विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक यावरूनही विठ्ठल परिवार व राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यामुळे भालके कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळू नये, यासाठी पंढरपुरातील राष्ट्रवादीतीलच काही गट पार्थ पवारांचे नाव पुढे करत त्यांच्या नावाची चाचपणी करत आहेत. तर भालके समर्थक मात्र भालके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न मिळाल्यास २००९ साली बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने केलेली चूक, त्यानंतर गमवावी लागलेली हक्काची जागा याची आठवण करून देताना दिसत आहेत.