सोलापूर : महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात सोलापूरच्या आठ दिवसाआड अनियमित पाणी पुरवठ्याच्या प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. शिंदे यांनी सोलापूरचे दोन मंत्री काय कामाचे, असा सवाल केला. आगामी काळात सोलापूर शहर पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासाठी व आषाढी वारीसाठी पाण्याचे काय नियोजन आहे, याबाबत जलसंपदा मंत्री यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये उजनी धरण १०० टक्के भरलेले असताना सुद्धा गेल्या ८ ते ९ महिन्यांमध्ये सोलापूर शहराला ६ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ सोलापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदा आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या उजनी धरण हे वजा ५९ टक्के झाले असून सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात दुष्काळ असताना उजनी धरण वजा ५० टक्के असताना सुद्धा सोलापूर शहरात २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु सध्या सरकारच्या दोन मंत्र्यांमुळे व प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करण्याचे कोणतेच नियोजन दिसून येत नाही. यामुळे शासन कोणती उपाययोजना करणार, असा सवाल आ़ शिंदे यांनी केला.
प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे डॉ.मिलिंद माने यांनी विचारलेल्या प्रश्नात राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्याच्या विविध भागात पाणीप्रश्नाने उग्र रूप धारण केलं असून लोकांना शंभर दीडशे किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे आणि ही वेळ लोकांवर आली ती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे, अशी टीका पवार यांनी केली. प्रणिती शिंदेंसह भारत भालके, राजेश टोपे यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली.
शेवटी गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले, की उजनीतून पाणी सोडल्यानंतर ते मध्येच अनेक भागात उचलले जाते आणि ही गोष्ट वर्षानुवर्षे सुरू आहे. यंदा दुष्काळाची स्थिती अनेक भागात गंभीर आहे आणि मराठवाड्यातील धरणात तर अर्धा टक्काही पाणी नाहीे. मात्र, विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने अखेर उपाध्यक्ष विजय औटी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.
आज मंत्रालयात होणार तातडीची बैठक- आ़ प्रणिती शिंदे यांनी पाणीप्रश्नावरून केलेल्या आरोपामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात व उजनी धरणाच्या पाणी वाटपाचे नियोजन करण्यासाठी तातडीच्या बैठकीची घोषणा केली़ ही बैठक शुक्रवारी (२१ जून २०१९) होणार आहे़ या बैठकीस सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पाणीपुरवठा अधिकारी गंगाधर दुलंगे यांच्यासह अन्य अधिकाºयांची टीम उपस्थित असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली़