सोलापूर : तौफिक शेख आणि रेश्मा पडकनूर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी झळकी (ता. इंडी) येथील एका हॉटेलमध्ये १० मे रोजी सायंकाळी बैठक झाली होती. या भेटीत परस्परविरोधी फिर्याद शिथिल करण्याबाबतच्या कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. या सह्या केल्यानंतर तौफिक उठून बाहेर आले. एवढं करुनही तौफिक आपल्याशी दोन मिनिटं बसून दोन शब्द बोलला नाही यावरुन रेश्माने हॉटेलबाहेर राडा केला होता. पण या परिस्थितीत तौफिक शांत राहिले होते, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते समीउल्लाह शेख यांनी केला.
रेश्मा पडकनूर खून प्रकरणासाठी विजयपूर पोलीस काल सोलापुरात आले होते. दरम्यान, रेश्मा आणि समीउल्लाह शेख यांच्यातील एक आॅडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याबद्दलचा खुलासा करण्यासाठी समीउल्लाह यांनी रविवारी सायंकाळी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, माझी आणि रेश्मा पडकनूरची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. पण सात ते आठ महिन्यांपासून ती अधून-मधून मला फोन करायची.
पैशाच्या व्यवहारावरुन तौफिक शेखसोबत वाद सुरू असल्याचे तिचे म्हणणे होते. हा वाद वाढवू नका, दोघेही राजकीय क्षेत्रात काम करीत आहात, सुबरीने घे, असे तिला समजावून सांगितले होते. लोकसभेची निवडणूक सुरू असताना पुन्हा तिचे फोन सुरू झाले. सोलापुरात घडणाºया घडामोडींची तिला कुणीतरी माहिती देत असावे. सोलापुरातील कावेरी हॉटेलमध्ये दोघांत वाद झाल्याचे तिने मला सांगितले होते. त्यावरुन तिने तौफिक शेख विरुध्द फिर्यादही दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते पोलीस आयुक्तांना भेटायला गेले होते. या भेटीवेळी तिने विजयपुरातून मला फोन केला होता. याचा अर्थ ती सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होती.
यादरम्यान माझ्यासोबत फोनवर झालेल्या बोलण्याची क्लीप तिने काही लोकांना पाठविली असावी. ती इतरांसोबत झालेली बोलण्याची क्लीप मला पाठवित होती, अर्थात माझेही कॉल रेकॉर्डिंग करीत असणार.
पण हा वाद मिटवून घेण्यास आम्ही तिला राजी केले होते. त्यासाठी तिने सोलापुरातील एक वकील मागितला होता. मी एका वकिलाची भेटही घालून दिली. या वकिलाच्या भेटीनंतर रेश्माने तौफिकविरुध्द केलेले आरोप मागे घेण्याची तयारी दाखविली. परंतु, मी सोलापुरात येणार नाही. मला काय जामीन मिळेल. गरज असेल तर त्यालाच विजयपूरला यायला सांगा, असा निरोप तिने दिला होता. वकिलांशी चर्चा करुन दोघांनी सोलापूर-विजयपूरच्या सीमेवरील झळकी येथे भेट घेण्याचे ठरविले. १० मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला वकिलांसमवेत दोघेही भेटले. माझी एवढी बदनामी होऊनही तौफिकविरुध्द केलेली तक्रार मी मागे घ्यायला तयार होते. कागदावर सह्या केल्यानंतर त्याला माझ्याशी बोलू वाटले नाही. दोन मिनिटं बसून बोलला असता तर काय झाले असते, म्हणून मी त्याच्याशी भांडले, असे रेश्माने सांगितल्याचे समीउल्लाह शेख यांनी सांगितले. तौफिक शेख गेली पाच-सहा वर्षे कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर होते. ते दिवसातून पाच वेळा नमाजला जातात. त्यांचा या खून प्रकरणाशी संबंध असणार नाही, असे स्पष्टीकरण समीउल्लाह यांनी दिले.