सोलापूर: मागील वर्षी दूध खरेदी बंद आंदोलनातून शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही उलट दुधाचा दर कमीच झाल्याने शेतकºयांचे नुकसानच झाले. आता पुन्हा शेतकरी संघटनेचे सोमवारपासून दूध बंद आंदोलन सुरू होणार असल्याने दुधाचे करायचे काय?, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.
राज्यात शेतीमाल (फळे, पालेभाज्या, फळभाज्या) व दुधाचे दर घसरल्याने मागील वर्षी राज्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. १ जून ते ६ जून २०१७ या कालावधीत शेतीमाल व दूध वाहतूक विरोधात आंदोलन झाले होते. त्यानंतर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये जाहीर केला; मात्र त्याची कोणीही अंमलबजावणी केली नाही.
आंदोलनाच्या आठवडाभराच्या कालावधीत शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीमालाची नासाडी झाली व संस्थांनी दूध संकलन बंद केल्याने शेतकºयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर दुग्धविकास मंत्र्यांनी जाहीर केलेली दूध दरवाढ तर शेतकºयांना मिळालीच नाही, उलट मागील वर्षभरात गाईच्या दुधाचा खरेदी दर ८ रुपयाने कमी झाला आहे. जून २०१७ या महिन्यात गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये होता तो यावर्षीच्या जून-जुलै महिन्यात १७ रुपयांवर आला आहे.
आता शेतकºयांनी दूधच विकू नये, अशी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. प्रतिलिटर थेट शेतकºयांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करावे किंवा संस्थांनी दर वाढवून द्यावा, या शेतकरी संघटनेच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत दुधाचे करायचे काय?, असा शेतकºयांचा प्रश्न आहे. काही दिवस दुधाचे नुकसान सोसले तरीही दर वाढवून मिळण्याची खात्री नाही.
तोडगा निघणे कठीणच?- दूध दरवाढीसाठी आंदोलन होणार असल्याने थेट शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर अनुदान जमा करावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. राज्यात सहकारी संघाकडून ३५ टक्के व खासगी संघ व गवळ्यामार्फत ६५ टक्के दूध संकलित होत असल्याने दूध उत्पादक शेतकºयांची यादी नसल्याचे कारण सांगितले जाते असे परिचारक म्हणाले.